Top Newsराजकारण

आज ४३ मंत्री घेणार शपथ; विस्तारापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळातून अनेकांची उचलबांगडी !

महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड शपथ घेणार

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातील अनेक नेते दिल्लीत पोहचले आहेत. यात ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल, पशुपति पारस, नारायण राणे आणि वरूण गांधींचा समावेश आहे. विद्यमान मंत्रिमंडळातून पाच ते सहा मंत्र्यांना वगळून त्यांना पक्षाच्या कामात घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच, उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातून संध्याकाळी ५ पर्यंत ११ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यात डॉ. हर्षवर्धन (आरोग्यमंत्री), रमेश पोखरीयाल निशंक (शिक्षणमंत्री), संतोष गंगवार (कामगार मंत्री), देबोश्री चौधरी (महिला महिला राज्यमंत्री), सदानंद गौडा (रसायन व खते मंत्रालय), संजय धोत्रे (केंद्रीय राज्यमंत्री), थावरचंद गहलोत, प्रताप सारंगी (राज्यमंत्री), रतनलाल कटारिया (राज्यमंत्री), बाबुल सुप्रियो (राज्यमंत्री), रावसाहेब दानवे पाटील (राज्यमंत्री) यांचा समावेश आहे.

मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा खासदारांसोबत चर्चा केली.

थावरचंद गहलोत यांच्यानंतर ‘या’ मंत्र्यांचा राजीनामा

डॉ. हर्षवर्धन – केंद्रीय आरोग्य मंत्री असलेले डॉ. हर्षवर्धन यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारविरोधात प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. त्याचा फटका डॉ. हर्षवर्धन यांना बसला आहे. हर्षवर्धन यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा कारभारही होता. आता हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यानं २ मंत्रालय रिक्त झाले.

बाबुल सुप्रियो – पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून खासदार निवडून आलेले बाबुल सुप्रियो यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. ते पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. बाबुल सुप्रिया पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत बाबुल सुप्रिया यांना मैदानात उतरले होते. परंतु ५० हजार मतांनी त्यांचा पराभव झाला.

देबोश्री चौधरी – पश्चिम बंगालच्या रायगंड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले देबोश्री चौधरी यांनाही राजीनामा द्यायला सांगितला आहे. त्यांच्याकडे महिला आणि बालविकास मंत्रालयाचा कारभार होता. त्यांना पश्चिम बंगालमध्ये भाजपासाठी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते

रमेश पोखरियाल निशंक – उत्तराखंडच्या हरिद्वार येथून खासदार असलेले रमेश पोखरियाल निशंक यांनाही राजीनामा देण्यात सांगितले आहे. ते मानव संसाधन विकास मंत्री होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना झाला होता. एक महिना उपचारासाठी दवाखान्यात होते. आरोग्य निगडीत कारणामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला आहे.

सदानंद गौडा – कर्नाटक बंगळुरू येथील सदानंद गौडा यांनीही राजीनामा दिला आहे. ते रासायनिक आणि खते उत्पादन मंत्री होते. कोरोना काळात औषधांच्या उत्पादनावरून मोदी सरकारवर टीका झाली होती. त्याचा फटका सदानंद गौडा यांना बसला आहे.

संतोष गंगवार – उत्तर प्रदेशच्या बरेली येथील खासदार संतोष गंगवार यांनाही राजीनामा द्यायला सांगितला आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार त्यांच्याकडे होता. कोरोना काळात संतोष गंगवार यांनी लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल झालं. त्यात उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या जागी लखीमपूर येथील खासदार अजय मिश्रा यांना मंत्रिपद दिलं जात आहे.

संजय धोत्रे – महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे निवडून आले आहेत. शिक्षण विभागासह माहिती तंत्रज्ञान विभागाचे ते राज्यमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी संजय धोत्रे यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून हटवून पक्ष संघटनेचे काम दिले जाऊ शकते.

रतनलाल कटारिया – हरियाणातील अंबाला येथील खासदार रतन लाल कटारिया यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाचा कारभार होता. त्यांच्या जागी खासदार सुनीता दुग्गल यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

प्रताप सारंगी – ओडिशातील बालासोर येथील खासदार प्रताप सारंगी यांनाही राजीनामा देण्यास सांगितले आहे. ते सूक्ष्म, लघु व मध्यम यांच्यासह पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.

मोदींच्या बैठकीत राणेंना पहिल्या रांगेत पहिलं स्थान

काही फोटो ऐतिहासिक असतात. असाच एक फोटो सध्या महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. मंत्रीमंडळ विस्ताराआधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी संभाव्या मंत्र्यांची बैठक पार पडली. ह्या बैठकीचे फोटो आता समोर आलेत. या फोटोत प्रत्येक जण स्वत:च्या ओळखीचा, प्रदेशातला, भाषेचा, माहित असलेल्या मंत्र्याचा चेहरा शोधतोय. या बैठकीत खरं तर मराठी माणूस महाराष्ट्र शोधतोय. त्यातही चर्चा नारायण राणेंची असेल तर मग त्यांना शोधलंच जाणार.

हे दोन फोटो नीट बघा. यात दोन मराठमोळे नेते स्पष्टपणे दिसतायत. त्यातले एक आहेत नितीन गडकरी जे व्यासपीठावर मोदींच्या बरोबरीनं बसलेले आहेत. त्याच पंक्तीत अमित शाह आहेत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आहेत, खुद्द मोदी मध्यभागी आणि त्यांच्या बाजुला संरक्षणमंत्री राजनाथसिंह. त्यांच्याच डाव्या बाजुला निळ्या कुर्त्यात नितीन गडकरी. अर्थात नितीन गडकरी हे भाजपच्या टॉप ५ नेत्यांमध्ये मोडतात. त्यामुळे त्यांची हजेरी
आश्चर्यजनक नाही.

हेडमास्तरांची शाळा

याच फोटोत आणखी एक मराठी नेते आहे. त्यांना पहिल्या फोटोत थोडसं शोधावं लागतं कारण ते पाठमोरे आहेत. ते आहेत नारायण राणे. हेडमास्तरनं शाळेच्या सर्व शिक्षकांचा क्लास घेण्यासाठी बैठक बोलवल्यानंतर जी स्थिती असेल तशीच काहीशी ह्या फोटोत आहे. समोर संभाव्य मंत्री आहेत आणि मोदी गुरुजी, मोठ्या परिक्षेआधी चार ज्ञानाचे त्यांना धडे देतायत असं दिसतंय. राणे कुणाचं तरी असं एकदम शिस्तीतल्या मुलासारखं तेही पहिल्या रांगेत बसून ऐकतायत हेच महाराष्ट्राला सुखावणारं आहे. दुसऱ्या फोटोत मात्र राणे स्पष्टपणे दिसतात. फोटो त्यांच्या विरुद्ध बाजूने घेतला गेलाय. पहिल्या फोटो मोदी बसून बोलतायत तर दुसऱ्यात ते माईक घेऊन उभे आहेत. दुसऱ्या फोटोत पहिल्या रांगेत नारायण राणेंना स्थान आहे. ते पहिल्या खुर्चीवर आहेत. त्यांच्या बाजुच्या खुर्चीत आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल आहेत. राणेंना दुसऱ्या फोटोत ओळखावं नाही लागत. त्यांचा नेहमीचा कोट इथेही आहे. राणे
एखाद्या राजकीय नेत्यापेक्षा राजदूताच्या थाटात जास्त दिसतायत. पहिल्या फोटोत ते अमित शाहांच्या समोर दिसतायत. दुसऱ्यात मात्र फक्त मोदी.

अमित शाहांचं कनेक्शन

अमित शाह यांनी काही महिन्यांपुर्वीच राणेंच्या सिंधुदुर्गात येऊन त्यांच्या हॉस्पिटलचं उदघाटन केलेलं होतं. त्यावेळेसही राणेंवर शाहांनी स्तुतीसुमनं उधळली होती. आता त्यानंतर राणेंची थेट मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागतेय. याआधी कोकणातून मोदींच्या मंत्रीमंडळात सुरेश प्रभू होते. शिवसेनेचेही नेते होते पण भाजपचे म्हणाल तर प्रभूनंतर राणेच. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलंय. त्यामुळे प्रशासनाचा त्यांच्याकडे अनुभव आहेच. केंद्रातही मोदींना त्यांचा फायदा होईल. महाराष्ट्रातही भाजपला राणेंचा फायदा होईल यात शंका नाही. कारण शिवसेनेला डिवचायला राणेंशिवाय दुसरा कोण असेल?

जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न

कॅबिनेटच्या नव्या विस्तारात २७ ओबीसी आणि २० एससी-एसटी समाजातील चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदींच्या नवीन कॅबिनेटमध्ये १२ मंत्री दलित समाजातील आहेत. यात प्रत्येक मंत्री विविध SC समाजातील आहे. १२ मंत्र्यांपैकी २ जणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. २७ मंत्री OBC समाजातील आहेत. यात १९ मंत्री असे आहेत जे मागासवर्गीय जातीतून येतात. यादव, कुर्मी, जाट, दर्जी, कोळी अशा समाजाचा समावेश आहे. ओबीसी समाजातील ५ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं तर ८ मंत्री शेड्यूल ट्राईब्स(ST) समाजातील आहेत.

५ मंत्री वेगवेगळ्या अल्पसंख्याक समाजातील आहे. यात मुस्लीम १, शिख १, बौद्ध २ आणि १ ईसाई धर्मातील आहे. त्याशिवाय २९ ब्राह्मण, लिंगायत, पटेल, मराठा आणि रेड्डी समाजातील आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेट विस्तारात ११ महिलांचा समावेश आहे. यातील २ महिलांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाईल. नवीन मंत्रिमंडळ विस्तारात युवा चेहऱ्यांवर भर देण्यात आला आहे. ५० वर्षापेक्षा कमी असलेल्या १४ चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. यातील ६ जणांना कॅबिनेट मंत्री बनवलं जाईल. कॅबिनेट विस्तारानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय ५८ इतकं असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button