देशातील ४ राज्यांत कोरोनाचा ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’; आतापर्यंत आढळले ४० रुग्ण
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत आहेत, यातच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत चिंता वाढत आहे. आता या प्राणघातक व्हेरिएंटच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा हा धोकादायक व्हेरिएंट आता ४ राज्यात पसरला आहे. या राज्यांमध्ये आतापर्यंत एकूण ४० प्रकरणांची नोंद झाली आहे. तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही राज्ये आहेत. हा व्हेरिएंट चिंतेचा विषय असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
याआधी मंगळवारी सरकारने माहिती दिली होती की, भारतात कोरोना व्हायरसची डेल्टा प्लस व्हेरिएंटची २२ प्रकरणे सापडली आहेत. त्यापैकी १६ प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत. इतर प्रकरणे मध्य प्रदेश आणि केरळमध्ये नोंदवली आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले होते की, आतापर्यंत ज्या दहा देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. त्यापैकी भारत एक आहे. तर ८० देशांमध्ये ‘डेल्टा व्हेरिएंट’ आढळला आहे.
दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार असलेला डेल्टा व्हेरिएंट सध्या भारतसह जगातील ८० देशांमध्ये आहे. तर डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासह १० देशांमध्ये आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन, रशियासह भारतात सापडला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या या व्हेरिएंटचे प्रकरण लहान वाटत आहे, परंतु ते मोठे होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट किती वेगाने पसरतो आणि किती धोकादायक आहे, त्यानुसार ते वेगवेगळ्या प्रकारात ठेवले जाते. बर्याच देशांमध्ये बर्याच दिवसांपासून डेल्टा व्हेरियंट सापडला आहे, परंतु त्याचे नवीन व्हेरिएंट डेल्टा प्लस हे एक मोठे आव्हान बनत आहे, ज्यावर संशोधन चालू आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले की, बेजबाबदार वर्तन केल्यास ती येण्याची जास्त शक्यता आहे. लसीसोबत नियम व पथ्ये पाळली तर ती टाळता येईल. जर विषाणू जास्त संक्रमित होतोय किंवा त्याने स्वरूप बदलल्यासही धोका वाढू शकतो. परंतु, सध्या त्याबद्दल भाकित करता येणार नाही. ते म्हणाले, अनेक देशांत तिसरी, चौथी लाटही आली. परंतु, अनेक देशांत दुसरीही आली नाही.