वारकऱ्यांच्या दिंडीला भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, २२ जखमी
पुणे : कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून २२ वारकरी जखमी झाल्याची माहिती आहे. कान्हे फाटा येथे हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पायी जाणाऱ्या दिंडीत पिकअप घुसल्याने दोन वारकऱ्यांना गंभीर जखम झाली होती. उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. सविता वाळकू येरम (वय ५८, रा. उंबरे, खालापूर, रायगड) आणि जयश्री आत्माराम पवार (वय ५४, रा.भूतवली, ता. कर्जत, जि रायगड), सुरेखा चोरघे (रा. बीड), संगीता शिंदे (रा. साळोख) अशी मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडगाव-मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिक अप चालकाला ताब्यात घेतले आहे. खालापूर येथून ही दिंडी आळंदीकडे जात असताना सकाळी हा अपघात झाला.
हे मृतदेह शवविच्छेदनासाठी कामशेत येथे पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी पिकअप चालक आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर जखमींना महावीर हॉस्पिटल तसेच पवना हॉस्पिटल सोमाटणे येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.