त्र्यंबकेश्वरमधील मलनिःसारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर शहरातील सांडपाणी गोदावरी नदीत सोडले जाऊ नये यासाठी प्रस्तावित असलेल्या नगरपरिषदेच्या मलनिःसारण प्रकल्पाला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
त्र्यंबकेश्वर शहरातील सांडपाण्यामुळे गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित होते. राष्ट्रीय हरित लवादाने याची दखल घेऊन राज्य सरकारला शहरात मलनिःसारण प्रकल्प सुरु करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा मान ठेवून त्रंबकेश्वर नगर परिषदेने ३९ कोटी रुपयांच्या मलनिःसारण योजनेचा विकास आराखडा तयार करून तो सरकारला सादर केला होता. राज्य शासनाच्या सनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर नगरविकास विभागाने या कामासाठी निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून दोन टप्यात तो वितरीत केला जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात ४.५ एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी मलशुद्धीकरण प्रकल्पाची (एसटीपी) उभारणी करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात शहरात अंतर्गत मलनिःसारण वाहिन्यांचे काम केले जाणार आहे. या निर्णयामुळे शहरातील सांडपाणी शुद्ध होऊन नदीत सोडले जाणार असल्याने गोदावरी नदीच्या प्रदूषण पातळीत घट होण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. कार्यादेश मिळाल्यापासून दोन वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आदेश नगरपरिषदेला देण्यात आले आहेत.
कुंभमेळा आणि महाशिवरात्री निमित्त दरवर्षी लाखो भाविक त्र्यंबकेश्वर शहराला भेट देतात. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संख्या कमी असली तरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दुसरीकडे नद्या प्रदूषित होऊ नयेत ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर उभारल्यास गोदावरी नदीतील प्रदूषण पातळीत नक्कीच घट होऊ शकेल. याच भूमिकेतून या योजनेसाठी निधी दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.