
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी सनई-चौघडे वाजायला सुरुवात झालीय. राऊत यांची कन्या पूर्वशीच्या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. २९ नोव्हेंबरला मुंबईतील रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत सपत्निक राजभवनावर गेले होते.
खासदार संजय राऊत यांनी आज राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राऊत यांनी मुलगी पूर्वशीच्या लग्नाचं निमंत्रण राज्यपालांना दिलं. तत्पूर्वी संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबाला मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देत लग्नाची पत्रिका दिली. दरम्यान, राऊत यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे सकाळी काही काळ चर्चेला उधाण आलं होतं.
राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/jsAjdCfCU2
— Governor of Maharashtra (@maha_governor) November 9, 2021
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.




