गडचिरोली – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात राबण्यात येणाऱ्या अभियानाला आज मोठं यश मिळालं. आज सकाळपासून जिल्ह्यातील उत्तर-पूर्व भागातील छत्तीसगड सीमेजवळील परिसरात सुरू असलेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. या चकमकीमध्ये नक्षलवाद्यांचा एक मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे मारला गेल्याचीही चर्चा आहे. मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
गडचिरोलीमधील छत्तीसगडच्या सीमेवर आज सकाळपासूनच चकमकीला सुरुवात झाली होती. या चकमकीमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरून नक्षलवाद्यांचे शिबिर उद्ध्वस्त केले. यावेळी झालेल्या गोळीबारात तब्बल २६ नक्षलवादी ठार झाले. तर सुरक्षा दलांचे चार जवान जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमेटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नियोजनबद्धरीत्या त्या ठिकाणी अभियान सुरू केले. पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांच्या दिशेने कूच केल्याने ते हतबल झाले. या चकमकीत पोलिसांच्या गोळीने तब्बल २६ नक्षलवाद्यांचा वेध घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षल्यांकडील शस्त्रसाठाही जप्त केला.
सायंकाळपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेत २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. या चकमकीत काही नक्षल नेतेही मारले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत असलेला नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याचाही मृतांमध्ये समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गृहमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक
माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.