शिक्षण

दहावीचा निकाल सादर करण्यासाठी विभागीय मंडळांना २० दिवसांची मुदत

मूल्यमापन कार्यपद्धतीचा तपशील जाहीर

मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाने निकाल लावण्याचा निर्णय शिक्षण विभाग व राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानंतर मूल्यमान पद्धत कशी असावी, याचा तपशील आणि वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने बुधवारी जाहीर केले. त्यानुसार निकाल जाहीर करण्यासाठी शाळेतील ७ सदस्यांची निकाल समिती स्थापन करून २० ते २५ दिवसांत निकाल विभागीय मंडळांकडे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

विषय शिक्षक आणि वर्गशिक्षकांना ११ जूनपासून १० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण संकलित करून ते निकाल समितीकडे सादर करायचे आहेत. तर त्यापुढील १० दिवसांत निकाल समिती व मुख्याध्यापकांना ते गुण प्रमाणित करून, प्रणालीमध्ये भरून त्यानंतर विभागीय मंडळात सादर करायचे आहेत.

निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालाच्या २ प्रती तयार करायच्या असून, त्यातील एक प्रत मुख्याध्यापकांकडे तर दुसरी विभागीय मंडळाकडे जमा करायची आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या नववीच्या संकलित निकालाची प्रतही मुख्याध्यापकांना विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अजूनही अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन पूर्णपणे शिथील नसताना, शिक्षक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीच्या, यावर्षीच्या अभिलेखांचे गुण कसे संकलित करणार? आणि १० दिवसांत गुणदान कसे करणार, असा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापकांना पडल्याने ते संभ्रमात आहेत.

गुणदान कसे हाेणार ?

– दहावीचे गुणदान करताना पहिल्या ५० गुणांसाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या नववीच्या १०० पैकी असलेल्या गुणांचे शाळास्तरावर ५० टक्के गुणांत रूपांतर करायचे आहे. उरलेल्या ५० गुणांसाठी दहावीच्या यंदाच्या अंतर्गत लेखी गुणांचे ३० गुणांत रूपांतर करायचे आहे.

– अपवादात्मक परिस्थितीत जर शाळेत प्रथम सत्र किंवा सर्व परीक्षा झाल्या नसतील तर दहावीच्या अभ्यासक्रमावर आयोजित सर्व चाचण्या, गृहकार्य, प्रकल्प, स्वाध्याय यांचे शिक्षकांना ३० पैकी गुणांत रूपांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांना आज प्रशिक्षण

मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कार्यपद्धतीबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शिक्षण मंडळाकडून गुरुवारी दुपारी ११ ते १ दरम्यान मंडळाच्या यू ट्यूब चॅनेलवरून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button