पुण्यात १४ वर्षीय कबड्डीपटू मुलीची निर्घृण हत्या
पुणे : पुण्यात मंगळवारी संध्याकाळी महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्यात करण्यात आल्याचे समोर आले आहे. तिच्यावर कोयत्याने वार करून तीन जणांनी निर्घृण हत्या केली आहे. माहितीनुसार याप्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्याचा अजूनही शोध सुरू आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुण्यातील १४ वर्षी ही मुलगी स्थानिक संघामध्ये कबड्डीपटू होती. आज, मंगळवारी ती कबड्डीचा सराव करण्यासाठी बिबवेवाडीतील यश लाँच येथे गेली होती. तिथे तीन जणांनी तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. ज्यामध्ये दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. ही मुलगी आठवीत शिकणारी होती. याप्रकरणातील तीन आरोपींपैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अजून तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
याप्रकरणातील आरोपींची प्रथमदर्शनी ओळख पटलेली आहे. यामधील मुख्य आरोपीचे नाव ऋषीकेश भागवत असे आहे. आरोपी ऋषीकेश भागवत हा तिच्या नात्यातील असून तो मुलीचा चुलत मावस भाऊ लागतो, अशी माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय.
इतक्या अमानुषपणे वार करणारी व्यक्ती माणूस असूच शकत नाही : अजित पवार
पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थीनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे. समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणारी व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.