
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारीच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारच्या काळात मोठा कोविड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. १० दिवसांत हा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर आज पुण्यात बोलताना सोमय्या यांनी राज्यातील ३ जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठराविक कंपनीला काम देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत. त्यांच्यामुळेच लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरचं काम देण्यात आलं. लाईफ लाईनला काम देताना मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला. या रुग्णालयात अनेकांचे मृत्यू झाले. ९ दिवसांत लाईफ लाईनला ब्लॅक लिस्ट करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि दबावामुळेच लाईफ लाईनला महाराष्ट्रात ७ कोविड सेंटर चालवण्यासाठी देण्यात आले. ६५ कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं. जी कंपनी अस्तित्वात नाही, त्या कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅन्ड या कंपनीचा मालक आहे. त्याची चौकशी सरकार करणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारलाय.
त्याचबरोबर ज्या कंपनीनं लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केलं. त्यांच्या विरोधात सगळी कागदपत्रे माझ्याकडे आहेत. १०० कोटी कमावण्यासाठी रस्त्यावरच्या एका माणसाला हे काम दिलं गेलं. यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. तसंच दोन दिवसांत राज्यपालांकडून सर्व कागदपत्रे देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रयत्न सुरु आहे. कोविड सेंटरमध्ये अनेकांचे मृत्यू झाले, हे मृत्यू नाही तर हत्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निर्दोष नागरिकांच्या हत्या झाल्या, अशा शब्दात सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर हल्ला चढवलाय.
यापूर्वी ८ जानेवारी रोजी सोमय्यांनी मुंबईतील कोविड सेंटरची पाहणी केली होती. त्यावेळी आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरु आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. बीकेसीमध्ये २ हजार ४०० बेडपैकी ८०० बेडवर रुग्ण आहेत. दहीसरमध्ये ७५० बेड आहेत पण अजून एकही रुग्ण तिथे दाखल नाही. नेस्को सेंटरमध्ये २ हजार बेड्सपैकी ९०० बेड भरले आहेत. याचा अर्थ ९८ टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसंच ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील ९९.९९ टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला होता.