
जयपूर : राजस्थानमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा दिला आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद मिटला असून आता राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नवे मंत्री रविवारी दुपारी चार वाजता शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राजस्थानच्या मंत्रिमंडळात काँग्रेसकडून फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. यात कॅबिनेटमधील तीन ते चार मंत्र्यांच्या जागी नवे चेहरे पाहायला मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण आज गेहलोत यांच्या सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे सर्वाच अवाक् झाले आहेत. नव्या मंत्रिमंडळात आता कुणाकुणीची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांच्या निवासस्थानी आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला. उद्या दुपारी दोन वाजता प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात बैठक होणार असून यात पुढील सर्व निर्णय होणार आहेत. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा देखील जयपूरला पोहोचले आहेत. नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांबाबतही सहमती झालेली असल्याचं सांगितलं जात आहे.
कुणाकुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ
नव्या मंत्रिमंडळात सचिन पायलट यांच्या गोटातून अनेकांची नावं पुढे येत आहेत. यात हेमाराम चौधरी, बृजेन्द्र ओला, दिपेंद्र सिंह शेखावत, रमेश मीणा आणि मुरारीलाल मीणा यांची नावं आघाडीवर आहेत. दुसरीकडे गेहलोत यांच्या गोटातील बसपाचे राजेंद्र गुढा, अपक्ष महादेव खंडेला, संयम लोढा, काँग्रेसचे आमदार महेंद्रजीतासिंह मालवीय, रामलाल जाट, मंजू मेघवाल, जाहिदा खान आणि शंकुतला रावत यांची नावं आघाडीवर आहेत.
नवे ८ मंत्री, तिघांना बढती
गेहलोत मंत्रिमंडळात ८ नवे कॅबिनेट मंत्री असतील. तर तीन राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात येणार आहे. तर चार नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. २०२३ मध्ये राजस्थानात निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी सरकारमध्ये फेरबदल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राजस्थानात पंजाब फॉर्म्युला
काँग्रेसने राजस्थानात पंजाबचा फॉर्म्युला वापरल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार १२ नवे मंत्री आणि ३ जुन्या राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच चार अनुसूचित जातीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. ममता भूपेश, भजनलाल जाटव, टीकाराम जुली आणि गोविंद मेघवाल या चार दलित नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय कोणत्याही अपक्ष आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. नव्या विस्तारात सर्व मंत्री काँग्रेसचेच असणार आहे. बसपामधून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदारालाही नव्या विस्तारात संधी दिली जाणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पायलट समर्थकांना संधी
नव्या सरकारमध्ये सचिन पायलट यांच्या पाच समर्थकांची वर्णी लागणार आहे. गेहलोत-पायलट वादावर पडदा पाडावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी मंत्रिमंडळात पायलट यांच्यासह केवळ तिघांचा समावेश होता.
बॅलन्स साधण्याची कसरत
पायलट-गेहलोत यांच्या सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यामुळे पायलट यांच्या समर्थक नेत्यांना साईडलाईन करण्यात आले होते. गेल्यावर्षी तर पायलट यांच्या १८ समर्थकांनी उघड उघड बंड पुकारले होते. मात्र हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर हे बंड थोपवलं गेलं होतं. आता निवडणुका समोर आल्याने कोणताही वाद नको म्हणून पायलट समर्थकांची मंत्रिमंडळात वर्णी लावून रुसवे-फुगवे दूर करण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न केला जात आहे.




