राठोडांचं स्पष्टीकरण म्हणजे थोतांड; पूजा चव्हाण आत्महत्येची सीबीआय चौकशी करा : प्रसाद लाड
मुंबई : बीडच्या पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणात संशयित असलेल्या संजय राठोड यांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी सीबीआय चौकशीचे त्वरित आदेश देऊन न्याय मिळवून द्यावा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राद्वारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार असलेले प्रसाद लाड यांनी केली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यानंतर भाजपा नेते प्रसाद लाड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उघड झाल्यापासून गायब झालेले संजय राठोड माध्यमांसमोर आले आणि त्यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, राठोड यांचे स्पष्टीकरण नसून थोतांड आहे. ज्या पक्षाचे ते मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे निष्पक्ष चौकशी होईल ही अपेक्षा ठेवावी तरी कशी? जर संजय राठोड निर्दोष असतील तर त्यांनी सीबीआय चौकशीला सामोरे जावे, असे पुढे प्रसाद लाड म्हणाले आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आजपर्यंत मौन बाळगलेले मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केलं. पोहरादेवी गडावर जाऊन संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. बंजारा समाजावरील संकट दूर व्हावं यासाठी याठिकाणी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल असं म्हटलं. यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यानंतर आता प्रसाद लाड यांनी देखील याप्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि सीबीआय चौकशी करावी असे विनंती पत्र ठाकरे सरकारला दिले आहे.