Uncategorized

विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आरोग्य विभागाचा पर्याय

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नेमकं होणार कसं हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे राज्यातील मंत्री कोरोनाबाधित होत आहेत. जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी मुंबईत होणाऱ्या अधिवेशनाला येणारे लोकप्रतिनिधी त्यांचा स्टाफ, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांना कोरोनाची बाधा होऊ नये हे मोठे आव्हान असणार आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं चालवायचं याबाबत एक पर्याय समोर आला आहे. या पर्यायानुसार विधिमंडळाचे अधिवेशन दीर्घकाळही चालवता येऊ शकतं. विधानभवनात झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाने हा पर्याय मांडल्याची माहित समोर आली आहे.

काय आहे आरोग्य विभागाचा पर्याय?
– या पर्यायानुसार अधिवेशनाचे कामकाज जर जास्त दिवस चालवायचे असेल तर एक आठवड्यात चार दिवस कामकाज करायचे आणि त्यानंतर तीन दिवस सुट्टी द्यायची हा फॉर्म्युला सुचवण्यात आला आहे.
– यानुसार चार दिवस कामकाजात जर कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला तर तो नंतरच्या तीन दिवसात लक्षणे दिसून येतील. त्यामुळे पुढच्या आठवड्यात कामकाजाआधी पुन्हा चाचणी केल्यास कोणी कोरोनाबाधित असेल तर ते स्पष्ट होईल.
– अशा पद्धतीने आठवड्यातून चार दिवस कामकाज, तीन दिवस सुट्टी या फॉर्म्युल्यानुसार तीन ते चार आठवडे अधिवेशन चालवता येईल. या पर्यायाची चर्चा मात्र अजून झाली नाही. येत्या 25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
– दुसरीकडे विधानपरिषदचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी जास्तीत जास्त आमदारांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता यावं म्हणून अधिवेशनाआधी सगळ्यांना लस उपलब्ध करुन द्यावी यासाठी सरकारला पत्र लिहिले आहे.
संसदीय कामकाज बैठकीत 1 ते 8 तारखेपर्यंतचं कामकाज ठरलं

एरव्ही तीन आठवडे चालणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यकाळ यंदा किती असेल याबाबत अजून प्रश्न कायम आहे. संसदीय कामकाज बैठकीत काल (18 फेब्रुवारी) 1 ते 8 तारखेपर्यंतचे कामकाज ठरवण्यात आलं. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी पुन्हा 25 फेब्रुवारीला बैठक होणार आहे.

महाविकास आघाडी सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प यावेळी मांडणार आहे. गेल्या वर्षीपासून मान्सून असो किंवा हिवाळी अधिवेशन त्याचे कामकाज दोन दिवस चालले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी पूर्ण काळ चालावे अशी विरोधकांची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे लोकसभेचं कामकाज चालतं त्यानुसार इथलंही कामकाज चालावं अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button