चक्रीवादळाला लाजवेल असा मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा: मनसेची खोचक टीका

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता. ते खरंच देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, अशी खोचक टिप्पणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे. पुराणकाळात देवी-देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र, विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या या धावत्या भेटीवर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्र्यांनी विमानतळापासून मोजून १० किलोमीटर अंतरावरील भागांची पाहणी केली. आतमध्ये जाऊन कुठल्याही गावाला भेट दिली नाही. यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, अशी खरमरीत टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती.
मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 22, 2021




