विधानसभेत तेजस्वी यादव यांचा शाळेतील वर्गमैत्रिणीशी सामना!

पटना : बिहारच्या विधानसभेत आज एक वेगळीच घटना घडली. जदयूच्या नितीशकुमारांना घेरण्याच्या तयारीत असलेल्या राजदच्या तेजस्वी यादवांना त्यांची शाळेतील वर्गमैत्रिण भेटली आणि दोघे भर विधानसभेत बोलताना जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले. दोघांच्या चर्चेवर केवळ राजदच नाही तर जदयू आणि भाजपाच्या आमदारांनीही टेबल वाजवून प्रतिसाद दिला. यावेळी दोघे एकमेकांकडे पाहून हसत होते आणि चर्चाही करत होते.
बिहारमध्ये सोमवारी अर्थसंकल्प मांडण्यात आला. यानंतर आज सभागृहाचे कामकाज सुरु झाले. तेजस्वी यादव बोलायला उभे राहिले. काही मुद्दे बोलल्यानंतर त्यांनी क्रीडा विभागाचा उल्लेख केला. खेळाचा उल्लेख झाला हे पाहून आमदार श्रेयसी सिंह यांना रहावले नाही. त्यांनी जागेवर बसूनच तेजस्वी यादव यांना विरोध केला. हे पाहून विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांनी रोखले आणि जे काही बोलायचे आहे ते उभे राहून बोला असे सांगितले.
तेजस्वी यादवांनादेखील आश्चर्य वाटले, त्यांना श्रेयसी सिंह यांचा सामना करायचा नव्हता. मात्र, काही आमदारांनी श्रेयसी यांना बोलायला भाग पाडले. नंतर जी जुगबंदी रंगली ती पार शाळेच्या आठवणींपर्यंत जाऊन पोहोचली. श्रेयसी यांनी तेजस्वी यांना सुनावले. तुम्ही शूटिंग रेंजची चिंता करू नका, बिहारला आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असे त्या म्हणाल्या. यावर तेजस्वी यांनी, तुमच्यासारख्या आणखी मुली आहेत बिहारमध्ये असे सांगितले. यावर कालच बजेटमध्ये राजगीरमध्ये स्पोर्ट्स विद्यापीठ खोलण्याची घोषणा झाली आहे. जिथे आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रेंज बनविण्याचा प्रश्न आहे त्याबाबत मंत्री आलोक रंजन यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. सरकार आम्हाला मदत करेल.
तेजस्वी यादव यांनी यावर मला आनंद आहे की तुम्ही या सदनाच्या सदस्य झाला आहात. तुम्ही माझ्यासोबत शाळेतही होता, एकाच वर्गात होतो. हा काही तुमचा आणि तेजस्वीचा प्रश्न नाहीय. ज्या मुलांना चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाहीय त्यांच्यासाठी आहे, असे उत्तर दिले. या चर्चेवेळी दोघेही एकमेकांकडे बघून हसत बोलत होते. हे साऱ्या सभागृहाने पाहिले. असे वाटत होते की दोघेही त्यांच्या शाळेतील आठवणी ताज्या करत आहेत. शाळेत श्रेयसी यांनी तिरंदाजी आणि तेजस्वी यांनी क्रिकेटमध्ये करिअर केले.
कोण आहेत श्रेयसी सिंह…
श्रेयसी सिंह या दिग्विजय सिंह आणि पुतुल सिंह यांची कन्या आहे. श्रेयसी या जमुईमधून भाजपाच्या आमदार आहेत. श्रेयसी या इंटरनॅशनल शूटर असून अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे. दिग्विजय सिंह केंद्रात मंत्री राहिलेले आहेत.