राज्यात शनिवारी कोरोनाचे ८ हजारांहून अधिक नवे रुग्ण
मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवार राज्यात ८ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती आणि शनिवारीही राज्यात ८६२३ कोरोना नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर मुंबईमध्ये शनिवारी ९८७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि ४ जणांचा मृत्यू झाला. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे राज्यात शनिवारी ३६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत २० लाख २० हजार ९५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९४.१४ टक्के इतके झाले आहे.
राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मात्र वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी राज्यात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर शनिवारी मृत्युंची संख्या ५१ होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ टक्के असून आजपर्यंत ५२ हजार ९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सध्या राज्यात ३ लाख ३४ हजार १०२ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत आणि ३०८४ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.