योगी आदित्यनाथ, राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी : पिनराई विजयन
तिरुवनंतपूरम : केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू वेग घेताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी आहेत, असे विधान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे.
वायनाड येथून खासदार असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केरळच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन असेल, पण डाव्यांबाबत त्यांची भावना मात्र एकसमान आहे. याबाबीत त्यांचे एकमत आहे, असा दावा पिनराई विजयन यांनी केला आहे.
सन १९९० पासूनच्या काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांना जबाबदार धरत पिनराई विजयन यांनी त्यावर टीका केली. भारतातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रेरित केले गेले. काँग्रेसच्या कार्यकाळात लाखो शेतकऱ्यांचे रक्त सांडले. यासाठी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी पिनराई विजयन यांनी केली. राहुल गांधी केरळमध्ये येऊन अनपेक्षित हस्तक्षेप केले. देशाच्या इतर भागात सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत त्यांनी शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर चालवला. असे असले तरी राहुल गांधी यांच्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक आहे, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशातील १५ टक्के स्थलांतरित मजूर
योगी आदित्यनाथ म्हणतात प्रत्येक गोष्टीत केरळ मागे राहिला आहे. रोजगार नसल्याने येथील तरुण परदेशात जातात, असे योगी आदित्यनाथ म्हणतात. मात्र, केरळमधील १५ टक्के स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशातील असून, त्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. गेल्या पाच वर्षात केरळमध्ये एकही जातीय हिंसाचार झालेला नाही. पण उत्तर प्रदेशात काय स्थिती आहे? ते आपण पाहिले आहे. महिलांवरील अत्याचारात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, असे प्रत्युत्तर देत पिनराई विजयन यांनी योगी आदित्यनाथांवर टीका केली.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी वायनाड येथे ट्रॅक्टर रॅली काढली. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तिरुवनंतपूरम येथे बोलताना त्यांनी डाव्या सरकारवर टीका करताना रोजगार तसेच मच्छिमारांचा मुद्दा मांडला होता.