…म्हणून मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतले; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका
अहमदाबाद : अगदी भारत-इंग्लंड दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईपर्यंत जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपास आलेल्या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं ओळखलं जात होतं. मात्र बुधवारी सामन्यापूर्वी झालेल्या उद्घाटन समारंभात या स्टेडियमला भारताचे विद्यमान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी जगातील या सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन केलं. दरम्यान, या स्टे़डियमला नरेंद्र मोदी स्टेडियम असं नाव देण्यात आल्यानं अनेकांनी टीकेची झोत उठवली होती. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीदेखील यावरून जोरदार टीका केली आहे.
“काय नेता मिळाला आहे या देशाला. लोकं यांना विसरून जातील याची यांना चिंता आहे. यांना लोकांवर भरवसा नाही की मृत्यूनंतर यांची आठवण कोणी ठेवेल की नाही. यासाठीच मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली.