राजकारण

मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती

मुंबईः राज्यातील नोकरशाहीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत. सीताराम कुंटे यांना राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यालयानं ट्विटरवरून ही माहिती दिलीय. राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी 1985 च्या बॅचच्या सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी यांची नावे चर्चेत होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीताराम कुंटे यांच्या नावाला पसंती दिल्यानं ते आता राज्याचे मुख्य सचिव झालेत. सीताराम कुंटे येत्या 9 महिन्यांपर्यंत राज्याच्या मुख्य सचिवपदावर राहू शकतील, कारण नोव्हेंबर 2021 मध्ये तेही सेवानिवृत्त होणार आहेत.

प्रवीण परदेशी हे संयुक्त राष्ट्रामध्ये कार्यरत
सीताराम कुंटे सध्या गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत आहेत, तर प्रवीण परदेशी हे संयुक्त राष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (एमईआरसी) पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. तर एमएमआरडीएचे प्रमुख आर. ए. राजीव यांनाही 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलीय.

सीताराम कुंटे यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयातील नोकरशाही अजय मेहता यांच्या प्रभावातून मुक्त होणार असल्याचीही मंत्रालयात दबक्या आवाजात चर्चा आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर अजय मेहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार म्हणून मंत्रालयात होते. नुकताच अजय मेहता यांना महारेराला पाठविण्यात आलेय. सीताराम कुंटे मुख्य सचिव झाल्याबरोबर मंत्रालयातील दुसरे सर्वात महत्त्वाचे मानले जाणारे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) पदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. सीताराम कुंटे सध्या या पदावर आहेत. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव रिक्त होणार आहे.

कोण आहेत सीताराम कुंटे?
>> सीताराम कुंटे हे 1985 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी
>> गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सध्या कार्यरत
>> सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही सेवा
>> 2012 ते 2015 या कालावधीत मुंबई महापालिकेचे आयुक्तपद
>> मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम पाहिले
>> महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक विभाग हाताळण्याचा अनुभव
>> महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून अनुभव

कोण आहेत प्रवीण परदेशी?
>> प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
>> प्रवीणसिंह परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात (UNITAR) Global Programme Coordinator म्हणून कार्यरत
>> परदेशींनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा भार स्वीकारला होता.
>> प्रवीण परदेशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी असल्याचं सांगण्यात येतं
>> परदेशींनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे.
>> फडणवीसांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी सांभाळलेली आहे.
>> 1993 मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते.
>> लातूरमधील कामाचा धडाका पाहून परदेशींची मोठी प्रशंसा झाली होती.
>> देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेचच परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते.
>> परदेशी यांच्यावर फडणवीस यांनी नेहमीच विश्वास दाखवला होता.
>> पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

कुंटे-परदेशी एकाच बॅचचे
कुंटे आणि परदेशी एकाच बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. दोघेही येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळेच सीताराम कुंटे यांची नियुक्ती नऊ महिन्यांसाठी असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button