भाषण संपताच शेतकरी नेत्याचा व्यासपीठावर हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
अमृतसर: अमृतसरमधल्या विरसा विहारमध्ये स्वातंत्र्य सैनिक उजागर सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एका कार्यक्रमाला दातार सिंग उपस्थित होते. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दलचे विचार त्यांनी मांडले. अलविदा, माझी वेळ संपत आलीय, असं म्हणत त्यांनी भाषणाचा शेवट केला. ते खुर्चीत बसले. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन (farmers protest) करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करा अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. सरकारसोबतच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. या कालावधीत कडाक्याच्या थंडीमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काही शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना विरोध म्हणून स्वत:चं जीवन संपवलं आहे.
अमृतसरमध्ये कीर्ती किसान युनियनचे प्रधान मास्टर दातार सिंग यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. त्यांनी एका सभेला संबोधित केलं. भाषणाचा समारोप केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात सिंग यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी ते व्यासपीठावरच होते. उपस्थितांनी सिंग यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
गेल्या अनेक दिवसांपासून दातार सिंग दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत होते. तीनच दिवसांपूर्वी ते तिथून अमृतसरला परतले. कार्यक्रमासाठी त्यांनी अमृतसर गाठलं होतं. या कार्यक्रमात भाषणानंतर सिंग यांचा सत्कार करण्यात येणार होता. मात्र त्याआधीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सिंग यांच्या कुटुंबावर आणि त्यांना मानणाऱ्या शेकडो व्यक्तींवर शोककळा पसरली आहे.