Uncategorized

वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबच्या उपकंत्राटदाराची आत्महत्या

मुंबई : वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या उपकंत्राटदाराने आत्महत्या केली आहे. राजेश तावडे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबचे राजेश तावडे हे उपकंत्राटदार होते. पैसे थकवले असल्याने आत्महत्येला प्रवृत्त केले असा आशयाची सुसाईड नोट उपकंत्राटदाराने लिहिली आहे. यानंतर त्याने नॅशनल स्पोर्ट्स क्लबच्या बेसमेंटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. राजेश तावडे हा विक्रोळी परिसरात राहत होता. दरम्यान राजेश किती दिवसांपासून या ठिकाणी कामावर होता? त्याचे कोणासोबत काही वाद किंवा भांडण होता का? त्याच्या सुसाईड नोटमध्ये कोणाचा उल्लेख करण्यात आला का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया हे शहराच्या मध्यभागी असलेली एक संस्था आहे. कोरोना काळात या ठिकाणी जम्बो कोव्हिड सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. कोरोना काळात वरळी, महालक्ष्मी, बांद्रा, नेसको, गोरेगाव अशा मिळून 2475 खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत होत्या. वरळीच्या एनएससीआय डोम सेंटरमध्ये परळच्या टाटा रुग्णालयातील कर्करोग आणि कोरोना या दोन्ही आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या जम्बो कोव्हिड सेंटर रुपांतर आता जम्बो लसीकरण केंद्रात करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी लसीकरण सुरु आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी लसीकरणासह कोव्हिड रुग्ण उपचारही घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button