उच्च, तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑफलाईन-ऑनलाईन पद्धतीने होणार : उदय सामंत

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. आता उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलताना दिली. उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या परीक्षांचा निर्णय प्रत्येक विद्यापीठाने घेतलेला आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. मात्र त्या ऐच्छिक ठेवलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना जसं शक्य असेल तसे त्यांनी परीक्षा ऑफलाईन द्यायची की ऑनलाईन हे कळवावं लागणार आहे. तसा निर्णय सर्व कुलगुरूंनी घेतलेला आहे. तसेच इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निक सेमिस्टरच्या परीक्षा शंभर टक्के ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
दरम्यान, युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच दिलेली आहे. वसतिगृह टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन वसतीगृहाचे इलेक्ट्रिक आणि सेफ्टी ऑडिट करुन घेण्यात यावे, असेही विद्यापीठांना सूचित करण्यात आलेले आहे. परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरू केली गेली आहेत. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू झाली आहेत. उदय सामंत यांनी 1 फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर ही विद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यावेळी विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतिगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) विद्यापीठांनी तयार करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या होत्या.
असे असले तरी कोरोना महामारी लक्षात घेता संबंधित विद्यापीठाचे कुलगुरु आपत्ती व्यवस्थापनशी चर्चा करून महाविद्यालये सुरु करण्याविषयी निर्णय घेतील, अशी माहिती सामंत यांनी दिली होती. तसेच यावेळी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरु केली जातील, अशी माहितीही सामंत यांनी दिली होती. तसेच, यावेळी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक असेल, असे सामंत यांनी आवर्जून सांगितले होते.