तुमच्याकडे चाणक्य, तर आमच्याकडे तालमीतला बाप; नवाब मलिकांचा भाजपला टोला

परभणी: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तुमच्याकडे चाणक्य आहे, तर आमच्याकडे तालमीतला बाप आहे, अशी जहरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. ते परभणीत एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगरपालिकेतील काँग्रेसच्या १० नगरसेवकांनी मलिकांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले की, परभणी हा पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने जिल्ह्यातील अनेक कामे केली. अनेक प्रश्न सोडवले आहेत, कोरोनामध्ये होम क्वारंटाईन असेल या कोविड बाबत अनेक कामे केली करण्यात आली. राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी भाजपची दडपशाही होती. अर्धे लोक तुरुंगात जातील असं ते म्हणतात मात्र आम्ही घाबरत नाही. आमच्या नेत्यांच्या मागं ईडी आणि सीबीआय लावली आहे, त्याचा सामना करु, असं मलिक म्हणाले.
भाजपकडून विधानसभा निवडणुकीत कट कारस्थान करण्यात येत होतं, शरद पवार साहेब संपले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही जण तुमच्याकडे चाणक्य आहे, असं म्हणतात मात्र, आमच्याकडे तालमीतला बाप आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही झोपतो पण आणि झोप उडवतो पण, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला. नव्यानं लोक या पक्षात येतात त्यामुळे या पक्षात कोणताही नवा जुना वाद होणार नाही, याची काळजी घ्या, असंही नवाब मलिक म्हणाले.
राष्ट्रवादीचा राजेश विटेकर यांना पाठिंबा
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना परभणीत चंद्रकांत राठोड यांच्यामुळे सर्व बदल झाल्याचं दिसून येत असल्याचं म्हटलं. तसेच, परभणीतील राष्ट्रवादीची ताकद पाहता या जिल्ह्यात आपला खासदार निवडून येऊ शकतो, असंही ते म्हणाले. शरद पवार यांना तरुण नेतृत्व दिल्लीला जावे असे पवार साहेबांना वाटत होते. राजेश विटेकर यांना आम्ही सतत सांगत आलो तुम्ही काम करत रहा. राजेश विटेकर यांच्या मागे सर्व राष्ट्रवादीचे लोक आहेत, असंही पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली, शरद पवार माझ्या पाठिशी !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रिमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती नवाब मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली. तसेच, माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे, तसे पक्षप्रमुख शरद पवार पवार व राष्ट्रवाद पक्षही पाठिशी असल्याचं मलिक यांनी सांगितलं.
हीच का भाजप नेत्यांची संस्कृती?
दरम्यान, माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही, असा स्पष्ट इशाराही मलिक यांनी दिला आहे. तसेच, भाजपवर जोरदार टीकाही केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विटरवर मला एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देत असतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. भाजपचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला जनावराची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे. या उपाधीमुळे आमची इज्जत जात नाही उलट भाजपची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते असेही मलिक म्हणाले.