
अलिबाग : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावावर अलिबागमध्ये कोर्लेयी गावात १९ बंगले असल्याचा दावा केला. त्यानंतर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत हा दावा खोडून काढला. तसेच तुम्हाला जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन आणि दिसले नाही तर त्या किरीट सोमय्यांना जोड्याने मारा असं विधान संजय राऊत यांनी केलं. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामपंचातीतील कागदपत्रांचा पुरावा दिला. यामुळे खरंच हे बंगले आहेत की नाहीत असा प्रश्न सर्वांना पडला. याच संदर्भात एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने पडताळणी करत थेट ग्रामपंचायत आणि कथित बंगले असलेल्या घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी बंगले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भाजप नेते किरीट सोमैया तोंडावर आपटले काय, अस सवाल विचारला जात आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मुरुड कोर्लई येथील रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांच्या नावे साडे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. प्रत्यक्षात या जागेची पाहणी संबंधित वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने केली असता या जागेवर बंगले नसल्याचं समोर आलं. या जागेत नारळीची झाडे, गुरांचा गोठा, पंप शेड, विहीर ,पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा माफीनामा मागितला नसल्याचे कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्पष्ट केलं आहे.
सरपंचांचा खुलासा
अन्वय नाईक यांनी २००९ रोजी आमच्याकडे रिसॉर्ट बांधण्यासाठी परवानगी मागितली होती. २००९ रोजी कच्ची घरे बांधली मात्र, नंतर त्यांना रिसॉर्टची परवानगी मिळाली नाही. त्या जागेवर असलेली ११-१२ घरे होती ती तोडून तेथे झाडे लावली. झाडे लावल्यानंतर २०१४ ला त्यांनी ही जागा रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांना रितसर विक्री केली. त्यानंतर २०१५ ते २०१९ या काळात त्यांच्यापैकी कुणीही इथे आलं नाही. २०१९ मध्ये आम्ही वायकर यांना पत्र पाठवलं की, खरेदी करताना दिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवलं की २०१४ पासून ते २०१९ पर्यंतची घरपट्टीची थकबाकी भरावी त्या संदर्भात रितसर आम्ही नोटीस पाठवली. त्यानंतर त्यांनी २०१९ ला ही घरपट्टी आरटीजीएसने भरली.

घरपट्टी भरणा केल्यानंतर आम्ही ज्यावेळी त्या फार्महाऊसवर गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की, तेथे अशा प्रकारचं कुठलंही घर नसताना त्यांच्याकडून कर आकारणी केली आहे. त्यासंदर्भात आम्ही माहिती घेतल्यावर कळालं की, २०१३-१४ ला ही घरी तोडून तेथे झाडे लावण्यात आली. २०१९ ला जी घरे नावावर केली आहेत ती ११ घरे आहेत. या ११ घरांचा टॅक्स ग्रामपंचातीने २०२१ पर्यंत घेतला. आमच्या लक्षात आल्यावर आम्ही प्रत्यक्षात जागेवर जाऊन वस्तूस्थितीची पाहणी केली आणि तेथे घर न आढळल्याने ती घरे आम्ही रद्द केली असंही कोर्लई गावाचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी म्हटलं.
जोड्याने कोणाला मारणार?
रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्यापूर्वी १० वर्षांचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईक यांच्या नावाने १२ नोव्हेंबर २०२० ला रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे, किरीट सोमय्यांनी भरला नाही. संजय राऊत साहेब जोड्याने तुम्ही कोणाला मारणार आहात? असा सवाल किरीट सोमय्यांनी आज सकाळी उपस्थित केला होता. रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांनी टॅक्स भरला आहे आणि केव्हापासूनचा तर १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंतचा १९ बंगल्यांचा टॅक्स, आरोग्य कर, दिवाबत्ती कर हे भरण्यात आलं आहे. १२ नोव्हेंबर २०२० का? कारण, ११ नोव्हेंबर २०२० ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या जमिनीच्या संबंधित, व्यावसायिक संबंध हे किरीट सोमय्यांनी उघडकीस आणले होते. हे बंगले अन्वय नाईक यांनी २००८ ला बांधले. २००९ पासून दरवर्षी या बंगल्यांचा कर आधी अन्वय नाईक आणि त्यानंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर भरत आहेत असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं. अलिबागमधील १९ बंगल्यांचा कर रश्मी ठाकरेंनी भरला आहे. रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांनी कर भरला. जर बंगलेच नाहीत तर मग कर का भरला? असा सवालही यावेळी किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. ग्रामपंचायतीने दिलेले कागदपत्र किरीट सोमय्यांकडून सादर करण्यात आले. वनखात्याच्या जमिनीवर घरं बाधल्याचा किरीट सोमय्यांनी आरोप केला होता. आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्यानं मारू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. या आरोपांना उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत मोठा हंगामा केला. मला जोड्याने मारू म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे पुरावे पहावे, तपासाने आणि मग हवं असेल तर मला जोड्यानं मारावं, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतच पायातले जोडे काढले. आता या ठिकाणी बंगलेच अस्तित्वात नसल्याचे समोर आल्याने किरीट सॊमय्या यांचे आरोप बिनबुडाचे होते अशी चर्चा सुरु झाली आहे.




