लखनऊ : महाराष्ट्रात मागील सरकारच्या कार्यकाळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या. त्या सरकारमध्ये भाजपसोबत असल्याचे दु:ख वाटत असल्याचे कबुली महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. उत्तर प्रदेशमधील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवरही टीका केली. सध्याचे मुख्यमंत्री हे निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री होतील असा टोलाही त्यांनी लगावला.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेने आपले उमेदवार उतरवले आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी गोरखपूरमध्ये सभा घेतली. या वेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, उत्तर प्रदेशमध्ये द्वेषाचे राजकारण नको. प्रत्येक वेळी इथे लोकांना भीती दाखवली जाते. मात्र, प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत घाबरायचं कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. या मोर्चाला बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या हाती लाल झेंडे असल्याने त्यांना नक्षलवादीदेखील संबोधले. त्या सरकारमध्ये आम्ही होतो. त्याचे दु:ख वाटते. काही चुकीचे निर्णय घेण्यात आले होते, असेही आदित्य यांनी म्हटले.
कोरोना काळात केंद्र सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलपणावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली. कोरोना काळात लॉकडाउनमध्ये मुंबईत असणाऱ्या उत्तर प्रदेशातील नागरिकांना पुन्हा गावी जायचे होते. त्यांच्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने वारंवार केंद्र सरकारकडे केली. मात्र, त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. दोन महिन्यांनी केंद्र सरकारने ट्रेन सोडल्या. मात्र, त्यासाठीदेखील तिकिट आकारणी केली. या तिकिटांचे पैसे राज्य सरकारने मुख्यमंत्री निधीतून भरले असल्याचेही आदित्य यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील नागरिकांची महाराष्ट्रात शिवसेनेने काळजी घेतली असल्याचे त्यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशात परिवर्तन करण्याची हाक यावेळी आदित्य यांनी दिली. उत्तर प्रदेशात रोजगार, महिलांना सुरक्षिता मिळायला हवी असेही त्यांनी म्हटले. उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असून सध्याचे आजी मुख्यमंत्री काही दिवसांनी माजी मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी म्हटले.