उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगीच राहणार…! चर्चांना पूर्णविराम
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) वरिष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात सुरू असलेल्या बैठकांवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आता या चर्चांना पक्षानेच पूर्णविराम लावला आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष नेत्यांत कसल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शाह हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेशशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांची समीक्षा करत आहेत.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे, की या बैठकांचा उद्देश आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी रणनीती आखणे आणि या निवडणुकांसाठी योगी हेच मुख्य चेहरा असती, हा संदेश राज्य नेतृत्वापर्यंत पोहोचवणे आहे.
गेल्या दोन दिवसांत भाजपचे मोठे नेते, पीएम मोदी, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात दिल्लीत बैठका झाल्या. सूत्रांनी म्हटले आहे, की या बैठकांचा उद्देश योगीचा विश्वास दर्शवणे आहे. एवढेच नाही, तर केंद्राच्या योजनांचे पालन, तसेच राजकीय आणि जातीय समिकरण हे मुद्देही या चर्चांच्या केंद्रस्थानी होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या योगींच्या या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रोड मॅपला अंतिम रूप देण्यात आले आहे. पक्ष नेत्यांनी सांगितले, की पीएम आणि सीएम यांच्या भेटीदरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यावरही चर्चा झाली. याच वेळी योगींनी त्यांच्या सरकारने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या कामांचीही माहिती पंतप्रधान मोदींना दिली, असेही सूत्रांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. स्थानिक निवडणुकीत खराब प्रदर्शनानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी परीक्षा होत आहे. यूपीत विधानसभेच्या ४०३ जागा आहेत. लोकसभेत येथून ८० खासदार निवडून जात असतात. एवढेच नाही, तर दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातूनच जातो, असेही म्हटले जाते.