मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर येडियुरप्पा समर्थकाची आत्महत्या

बेंगळुरू : कर्नाटकात भाजपचा मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे बी.एस.येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर मोठ्या कालावधीपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. राजीनामा देण्य़ापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणादेखील केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारला दोन वर्षे पूर्ण झालेल्या दिवशीच त्यांनी राजीनामा दिला. परंतु त्यांच्या राजीनाम्यानंतर समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात एका ३५ वर्षीय समर्थकानं आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपवला.
पोलिसांच्या माहितीनुसार त्या व्यक्तीचं नाव रवि उर्फ रचप्पा असं असून ते कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील बोम्मलपूर गावातील रहिवासी होते. ती व्यक्ती मजूर म्हणून काम करत होती, तसंच एका चहाच्या दुकानातही तो काम करत होता, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तो माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा कट्टर समर्थक होता. परंतु गावकऱ्यांनी असा दावा केला की तो येडियुरप्पा यांचा कट्टर समर्थक होता, परंतु त्यानं कर्जही घेतलं होतं.
परंतु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं कर्ज घेतल्याची बाब अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. तसंच त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असल्याचं पोलिसांनी म्हटलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर तो चिंतेत होता. तसंच त्यानं यानंतर स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतलं. त्यानंतर कदाचित त्यानं रात्री आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय या प्रकरणी कोणती अन्य बाजू आहे का याचा तपासही पोलीस करत आहेत.
येडियुरप्पा यांना दु:ख
या घटनेची माहिती मिळाल्या येडियुरप्पा यांनी दु:ख व्यक्त केलं. तसंच शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहनही केलं. त्यांनी याप्रकरणी एक ट्विटही केलं. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही चढउतार येत असता. परंतु कोणालाही त्यासाठी आपला बहुमूल्य जीव गमावण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.