राणेंना मंत्रिपद मिळाल्याने शिवसेना आणखी जोमाने काम करेल : उदय सामंत

यवतमाळ : मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना मंत्रीपद दिल्याने शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आता शिवसेना महाराष्ट्रात अधिक त्वेषाने वाढेल, जोमाने काम करेल, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने यवतमाळ जिल्हा प्रशासनाला आठ व्हेन्टिलेटर सोपवून त्याचे लोकार्पण करण्यासाठी उदय सामंत यवतमाळात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेनेचे कट्टर टीकाकार असलेले नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे मुंबईसह कोकणातील शिवसेनेला हादरा बसेल अशा वावड्या जाणीवपूर्वक उठविल्या जात असल्याचे सांगत, प्रत्यक्षात जेव्हा-जेव्हा शिवसेनेला अशा पद्धतीने डिवचले जाते, तेव्हा शिवसैनिक अधिक जोमाने कामाला लागतो. त्यामुळे राणेंच्या मंत्रीपदाने शिवसेना वाढीला हातभारच लागणार असल्याचे सामंत म्हणाले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेले व्हेन्टिलेटर बिघडणार नाही. कारण हे व्हेन्टिलेटर केंद्र शासनाने पाठविलेल्या व्हेन्टिलेटरप्रमाणे कामचलावू नाही. केंद्राने यवतमाळात पाठविलेल्या ३५ व्हेन्टिलेटरपैकी केवळ २१ व्हेन्टिलेटर सुरू आहेत. तर उर्वरित १४ व्हेन्टिलेटर खराब निघाले. हीच परिस्थिती केंद्राने अन्य जिल्ह्यांमध्ये पाठविलेल्या व्हेन्टिलेटरची आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली. शिवसेनेने दिलेले व्हेन्टिलेटर दीर्घ काळ टिकणारे असून आरोग्य प्रशासनाने त्याचा योग्य वापर करावा असेही त्यांनी सांगितले.