‘त्या’ सीडीची पोलिसांकडून चौकशी सुरु : खडसे
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माझी ईडी लावली तर सीडी बाहेर काढीन असं विधान केलं होतं. त्यानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली तरी त्यांनी सीडी बाहेर काढली नव्हती. त्यावरून खडसेंना डिवचण्यातही आले होते. मात्र, आता खडसेंनी पहिल्यांदाच सीडीबाबत भाष्य केलं आहे. योग्यवेळी मी सीडी लावणार आहे, असा इशाराच एकनाथ खडसे यांनी दिला आहे. ईडी लावली तर सीडी लावेन असं मी म्हणालो होतो. हे खरं आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं खडसे म्हणाले.
गेल्या ४० वर्षात माझ्यावर एकही आक्षेप आलेला नाही. राजकारणात कधीही कुणी माझ्याविरोधात काही बोललेलं नाही. पण जमिनीबाबत माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप करण्यात आला. कोर्टानेही आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला? त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे.
जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की दादांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी. त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे चंद्रकांतदादांनी मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभेत मी वारंवार विचारलं माझा दोष काय आहे ते सांगा. आता ईडीने चौकशी लावली. ती कोर्टात काय व्हायचं ते होईल, असंही त्यांनी सांगितलं.
सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीवर परिणाम होईल, असे आपण बोलणार नाही. परंतु खान्देशातील नेतृत्व संपविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप खडसे यांनी विरोधकांवर केला आहे. तसेच, सक्त वसुली संचालनालयाने आपली संपत्ती जप्त नाही तर अॅटॅच केल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, ५० वर्षापूर्वी आपल्याकडे ६० एकर जमीन वडिलोपार्जित आहे. ४० वर्षात आपण इतकी विकास कामे केली आहेत की आपल्या पासंगालाही कुणी पुरणार नाही.
याचबरोबर, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्यात येईल, असेही एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान, पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे.
एकनाथ खडसेंवर असलेल्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे व त्यांचा जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. याचा बाजारभाव ३१ कोटी असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटींना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किमतीत व्यवहार कसा झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? याबाबत ‘ईडी’ चा तपास सुरू आहे.
एकनाथ खडसे यांच्या ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणताना ईडीने खडसे यांचा लोणावळा येथील बंगला, जळगाव येथील तीन जमिनी आणि तीन फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच, बँकेतील ८६ लाखांच्या ठेवीसुद्धा गोठविल्या आहेत, अशी माहिती मिळते आहे.