मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार? एसआयटी कोर्टात जाणार
मुंबई : एनसीबीने समीर खान यांच्या संदर्भातील प्रकरणावर एक निर्णय घेतला आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी आता कोर्टात जाण्याचा विचार करत आहे. मंत्री नवाब मलिक सातत्याने अमली पदार्थ विरोधी पथकावर हल्ले चढवत असल्याने पुढील राजकीय वादाला तोंड फुटणार हे जवळपास निश्चित आहे. जामिनाला आव्हान देण्याचा निर्णय पहिल्यांदा गेल्या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आला होता, अशी बातमीही एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती.
बॉलीवुड बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यापासूनच, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात मलिक विरुद्ध वानखेडे, असे चित्रही पाहायला मिळाले. मलिकांच्या आरोपांनंतर आता एनसीबीने मोठा निर्णय घेत, वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्स प्रकरणाशिवाय आणखी ५ केसेसचा तपास काढून घेतला आहे. त्यामध्ये, मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर वसूलीसह अनेक अरोप केले होते. तर, मलिक यांच्या जावयाविरुद्ध ड्रग्जप्रकरणी कारवाई केल्यामुळेच मलिक आपला राग काढत असल्याचे आरोप वानखेडे कुटुंबीयांकडून करण्यात आले. एनसीबीला २० हजार रुपये किमतीच्या व्यवहाराचे पुरावे सापडल्यानंतर नवाब मलिकांचा जावई समीर खानला एका ड्रग्स प्रकरणात समन्स पाठवण्यात आले होते. त्याला जानेवारीमध्ये अटकही झाली होती. समीर खान यांच्याकडे तब्बल २०० किलोपेक्षा जास्त ड्रग्ज होते, असे तपास यंत्रणांनी सांगितले होते. परंतु मलिक यांनी “हर्बल तंबाखू” असल्याचा दावा केला आणि सप्टेंबरमध्ये समीर खान यांचा जामीन मंजूर करण्यात आला. आता, एसआयटीकडून या जामीनंसदर्भात वरिष्ठ न्यायालयात जाण्याचा एसआयटीचा विचार आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करुन समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतल्याचे सांगितले आहे. समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणासह ५ खटले मागे घेण्यात आले आहेत. अशी २६ प्रकरणे आहेत, ज्यांची चौकशी आवश्यक आहे. ही तर फक्त सुरूवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असे ट्विट मलिक यांनी केले आहे. दरम्यान, एनसीबीचे एक पथक या प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेण्यासाठी शनिवारी मुंबईत पोहोचेल.