नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली आहे. प्रियंका गांधी कित्येक तासांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. याच दरम्यान आता त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का? असा संतप्त सवाल करत प्रियंका यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
प्रियंका गांधी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने कोणत्याही आदेश किंवा एफआयआरशिवाय मला गेल्या २८ तासांपासून ताब्यात ठेवलं आहे. अन्नदात्याला चिरडणारी ही व्यक्ती अद्याप अटकेत नाही, असं का? अशी विचारणा प्रियंका यांनी ट्विटमधून केली आहे. यावेळी त्यांनी त्यादिवशी झालेल्या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
शेतकऱ्यांचं आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल. या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला.