मुक्तपीठ

मुस्लिम विचारवंत स्वधर्मावर गप्प का?

- पुरुषोत्तम आवारे-पाटील

अलीकडे कवी आणि विचारवंत जावेद अख्तर यांनी तालिबान आणि हिंदू कट्टरता यावर काही विचार व्यक्त केल्यावर त्यावर सर्व बाजूंनी मोठी टीका झाली. अख्तर जे काही बोलले ते याआधी विविध विचारवंत विविध प्रसंगी बोलले आहेत. आपल्या देशात काही घडले जे मानवतेला काळिमा फासणारे असेल त्यावर विचार करणार्‍या व्यक्तीने बोलायलाच हवे मग त्या व्यक्तीचा धर्म, जात किंवा पेशा कोणताही असो. परंतु आपल्या देशातील काही मुस्लिम विचारवंत इस्लाम सोडून जगातल्या सर्व धर्म आणि प्रश्नांवर बोलत असतात हा काय प्रकार आहे? मुस्लिम नट, नट्या, पत्रकार, लेखक, विचारवंत सगळ्या समस्येवर बोलत असतात फक्त इस्लामवर बोलताना त्यांचे ओठ का शिवले जातात ?

परवा एक अभ्यासू तरुण मला भेटला. त्याचे विचार पुरोगामी आहेत. सगळ्या धर्माचा तो सन्मान करतो. तो म्हणाला हजारो वर्षांपासून इस्लाम धर्म असाच कट्टर आहे का? त्याच्या प्रश्नाला संदर्भ तालिबानमधील घडामोडींचे होते. आजच्या काळात स्त्रियांनी शिकण्याची किंवा नोकरी करण्याची गरज नाही, त्यांनी केवळ मुलांना जन्म द्यावा, असे कुणी कसे म्हणू शकतो? हा त्याचा मुद्दा होता. त्याला इस्लाम धर्म एवढा जुनाट आणि प्राचीन का वाटावा? खरंतर इस्लाम हा जगातला सर्वात नवा धर्म आहे् त्याला स्थापन होऊन केवळ 1400 वर्ष झालीत. पण तो वाटतो पाच, दहा हजार वर्षांपूर्वीचा, इथेच खरी गोम आहे.

इस्लामच्या तुलनेत ख्रिश्चन, बौद्ध आणि हिंदू धर्म जुने आहेत. मात्र ते नवे वाटतात. कारण ते प्रवाही आहेत. धर्म आणि धर्म ग्रथांची या तिन्ही धर्मात चिकित्सा केली जाते.येशू, गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर आजवर शेकडो पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हिंदू तत्त्वज्ञान सांगणारी हजारो पुस्तके निघाली आहेत, आजही निघत आहेत मात्र अल्लाहची आज्ञा मानल्या जाणार्‍या कुराण शरीफ या धर्म ग्रंथावर आधारित असलेला एकही ग्रंथ जगभरात कुठेही निर्माण होऊ शकला नाही. ज्ञानेशवरी, भगवतगीता यावर आपल्या देशातल्या असंख्य विद्वान लोकांनी, संतांनी ग्रंथ लिहिले, परंतु एकाही सर्वोच्च मुस्लिम मुल्ला, मौलवीला कुराण शरीफवर ग्रंथ का लिहिता आला नाही यावर विचार मंथन होण्याची गरज आहे.

कुराण या धर्म ग्रंथामध्ये ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, त्याहीपेक्षा कठोर आज्ञा हिंदूंना मनुस्मृतीमधून देण्यात आल्याच होत्या ना. मग त्याला चिकटून बसत शब्दप्रामाण्य स्वीकारीत हिंदू वागताना दिसला नाही. उलट हे पाळण्याची ज्यांची पहिली जबाबदारी होती त्याच ब्राह्मणांनी आपल्या लेकी, सुनांना स्वातंत्र्य देऊन समाजात सन्मान दिला. सप्त सिंधुबंदी तोडून मुला, मुलींना शिकायला पाठवले आहे हे मला खूप महत्त्वाचे वाटते. कुराण शरीफमध्ये असणारा मानवी मूल्यांचा विचार जगापुढे मांडताना धर्माच्या ठेकेदारांना जसा वाटला तसा तो मांडला गेल्यामुळे संपूर्ण जग त्याकडे आकृष्ट नाही होऊ शकले याचे पातक घ्यायला कुणीही तयार नाही.

चौदाशे वर्षापूर्वी प्रेषित महंमद यांना जे अनुभव आले, जसे आकलन झाले ते त्यांनी मांडून ठेवले किंवा प्रतीत झाले आहे. आताच्या काळाला त्यातील बाबी सुसंगत आहेत की नाही हे तपासून पाहण्याची यंत्रणा इस्लाममध्ये कट्टर वर्गाने कधी निर्माण होऊ दिली नाही. परिणामी, जगभरातील कोट्यवधी अनुयायी वाहत्या, प्रवाहित धर्म तत्त्वज्ञानापासून वंचित राहिले. त्यावर आजच्या मुस्लिम विचारवंत, लेखक पत्रकारांनी बोलण्या, लिहिण्याची गरज आहे मात्र तसे न करता हे विद्वान लोक इतर धर्मातील कट्टरता वादावर बोलताना दिसतात हे दुरुस्त व्हायला हवे, असे मला वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button