मुंबई/सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरुन, सिंधुदुर्ग- मुंबई दरम्यानच्या पहिल्या विमानाचे उड्डाण आणि चिपी विमानतळाचे उद्घाटन आज केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील यावेळी उपस्थित होते. हायब्रीड म्हणजेच, आभासी आणि प्रत्यक्ष अशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने सिंधुदुर्ग विमानतळावरुन, अलायन्स एअर विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग विमानतळावरुन विमानाला रवाना केले.
येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सिंधुदुर्ग विमानातळावरून, २० ते २५ विमानांची वाहतूक सुरु व्हावी, अशी आपली इच्छा आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील विमानतळाचा विकास आणि प्रगती करण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालय सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन, शिंदे यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रासोबत आपले केवळ राजकीय संबंध नसून या राज्यासोबत आपले एक कौटुंबिक नाते असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करत महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आपल्या आयुष्यातला हा एक भावूक क्षण असल्याचे देखील त्यांनी नमूद केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाच्या उद्घाटनामुळे, गेल्या तीन दशकांचे स्वप्न पूर्ण झाले असून एक नवा अध्याय यामुळे रचला गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल महाराष्ट्र राज्य सरकार आणि एमआयडीसी यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकण आणि सिंधुदुर्ग प्रदेशाला लाभलेला गौरवशाली इतिहास आणि या भागाचे सौंदर्य आज या विमानतळ उद्घाटनाच्या माध्यमातून हवाई वाहतुकीच्या नकाशावर आले आहे, या प्रदेशाचे हे वैशिष्ट्य आता देशात प्रसिद्ध करण्याचा आपला संकल्प असल्याचं शिंदे म्हणाले. आजच्या या उद्घाटनामुळे पाचशे तीस किलोमीटरचे अंतर हे केवळ ५० मिनिटात कापले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
अलायन्स एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत सूद यांनी सिंधुदुर्ग पासूनचा पहिला बोर्डिंग पास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्ली इथे सुपूर्द केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग इथे महाराष्ट्रचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना बोर्डिंग पास सुपूर्द करण्यात आला.
विमानतळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त करत या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं म्हटलं. या विमातळाचा इतिहास मोठा आहे. एकट्या दुकट्यानं काही होत नाही. कोकणाला निसर्गाचं वरदान आहे. कोकणाचं सौदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. सध्या चिपी विमानतळाचा अडीच किमीचा रन वे आहे. आम्ही येताना पाहत होतो आणि चर्चाही केली. याच्या बाजूला मोकळी जागाही आहे. हा रन वे साडेतीन किमीचा होऊ शकतो, असं पवार यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतल्याचंही सांगितलं. तसंच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही गडकरींचीही भेट मागितली असल्याची माहिती दिली.
महामार्गासाठी असणाऱ्या अडचणी आम्ही सोडवणार आहोत. गोव्याला जाणारा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. गडकरींनी महाराष्ट्राला भरीव मदत केली. आपण मुख्यमंत्र्यांसोबत बोलून प्रश्न सोडवू आणि आर्थिक जबाबदारीही उचलू असं गडकरी म्हणाले, असल्याचंही पवार यांनी नमूद केलं. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि शिक्षणासाठी मेडिकल कॉलेजही मंजुर करण्यात आलं आहे. त्याचा फायदा सर्वांना होणार आहे. पर्यंटनाच्या बाबती आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे याचं लक्ष आहे. त्यांनी आणलेले प्रस्तावही विकासाच्या दृष्टीनं आम्बी मंजूर करत असतो. पुढील काळात कोकणातील आर्थिक परिस्थिती अधिक उत्तम व्हावी अशी अपेक्षा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अनेक वर्षांनी योग आला, पण त्यासाठी पायगुणही असावा लागतो : सुभाष देसाई
यावेळी मंचावरून सुभाष देसाई यांनी तुफान फटकेबाजीही केली. अनेक वर्षांनी विमानतळाचा हा योग आला. अनेक वर्ष काम प्रलंबित होतं असं अनेक जण म्हणतात. परंतु काम पूर्ण होण्यासाठी पायगुणही लागतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपानं पायगुणानं हे काम पूर्ण झालं. खासदार विनायक राऊत यांनी सातत्यानं या विमातळासाठी पाठपुरावा केला. पाठपुरावा झाला नाही, असा एकही महिना त्यांचा गेला नाही, असं देसाई यावेळी म्हणाले.
एमआयडीसीनंदेखील या विमानतळासाठी सातत्यानं काम केलं. विमानतळाचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा, विमानतळासाठी भूसंपादन ही प्रक्रिया पूर्ण केली. आज हे विमानतळाचं काम पूर्ण झालं आहे. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. यामुळे कोकणवासीयांचा उत्कर्ष होईल. सर्वांनी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकत्र काम केलं तर काय होतं हे या विमानतळाच्या दृष्टीनं दिसून येतं. कोकणवासीयांची जी स्वप्न आहेत ती नक्कीच साकार होतील. या विमातळामुळे पर्यटन वाढणार असल्याचंही ते म्हणाले.
आज पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. गाडीनं या ठिकाणी यायचं म्हटलं तरी किमान ५ हजार रूपये लागतात. परंतु यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून २४०० रूपयांत प्रवास करता येणार आहे. हे नक्कीच दिलासादायक आहे, असं देसाई यावेळी म्हणाले.
जगातून पर्यटक कोकणात येईल, यावर भर देणार : आदित्य ठाकरे
यावेळी पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोकणवासीयांना काही आश्वासने दिली. कोकण जगातील पर्यटकांचे आकर्षक केंद्र आहेच. मात्र, जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात कसे येतील, यावर भर देणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली.
संपूर्ण कोकणवासीयांकडे खरोखरच आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. पर्यटन मंत्री म्हणून आश्वासन देतो की, कोकणच्या विकासासाठी अग्रेसर असू. या ठिकाणी येताना विमान लँड करत असताना कोकणाचे अद्भूत सौंदर्य पाहिले. निळे पाणी, लाल माती, मनमोहक समुद्र किनारा पाहिला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाचाच जिल्हा आहे. या जिल्ह्यात पर्यटनाची मोठी क्षमता आहे. त्यादृष्टीनेच पुढील काळात काम आणि योजना आखणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील कोकण हे संपूर्ण जगभरात पर्यटनाचे एक प्रमुख आकर्षण केंद्र असून, यापुढे जगातील प्रत्येक कोपऱ्यातून पर्यटक कोकणात कसे येतील, यावर भर देणार आहे. तसेच प्रत्येक आठवड्यात कोकणासाठी काय करू शकतो, याकडे लक्ष देणार आहे. राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत कोकणच्या विकासासाठी नवीन योजना आणण्यावर काम करणार आहोत. चांगल्या बसेस, चांगली वाहतूक आणि ५ स्टार हॉटेल आणणार आहे. मात्र, पर्यटनावर भर देताना पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याकडेही अधिक लक्ष दिले जाईल, विमानतळाच्या माध्यमातून पर्यावरण जोपासत कोकणचा विकास करूया, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करू नयेत : विनायक राऊत
विमानतळाचा विकास कोणी केला यावरून नारायण राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये श्रेयवाद सुरू होता. याच दरम्यान उदघाटनापूर्वी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडसच करू नये” असं म्हणत हल्लाबोल केला आहे, असा विनायक राऊतांनी राणेंना सणसणीत टोला लगावला आहे. तसेच पोस्टरबाजीवरूनही टीका केली आहे. स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडसच करू नये. शिवसेनेनं गेल्या दोन वर्षांत ज्या पद्धतीने सिंधुदुर्गात काम केलंय, ते पाहाता आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार आहोत. आम्हाला घाबरण्याचं कारण नाही, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.