सचिन वाझेसोबत असणारी ती महिला कोण? : खा. नारायण राणे
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार मेहनत घेतली, तरीही बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमास न बोलावण्याचा संकुचितपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खा. नारायण राणे यांनी शुक्रवारी केली. भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी लॉकडाऊनपासून सचिन वाझे प्रकरणापर्यंत ठाकरे सरकारवर शरसंधान साधले. पत्रकार परिषद लॉकडाऊन, कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार या तीन मुद्द्यांवर असल्याचे स्पष्ट करतानाच सचिन वाझेसोबत ओबेरॉयमध्ये येणारी ती बाई कोण असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. महिन्याला 100 कोटी जमवायचे आणि अनिल देशमुखकडे नेऊन द्यायचे ही सचिन वाझेवर जबाबदारी होती. सचिन वाझे नेमका कोणासाठी काम करत होता? जनतेच्या सुरक्षेसाठी की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पैसे पुरवण्यासाठी काम करत होता. एनआयएच्या चौकशीतून खरी गोष्ट लवकरच बाहेर येईल. युनूस या अतिरेक्याच्या हत्येतही वाझेचा समावेश होता. एक एपीआय सचिन वाझे ओबेरॉयमध्ये राहू शकतो. तो जिथे राहायचा त्या ओबेरॉयच्या कॅमेऱ्यामध्ये एका महिलेचा फोटो आहे. ती भाईंदरला राहणारी आहे. एनआयएनं तिच्या भाईंदरच्या घरीही छापा मारला. ती महिला आणि ओबेरॉयमध्ये येणारी महिला सारखीच आहे. ती महिला वाझेसोबत कोणतं काम करत होती.
या सरकारला एवढे दिवस माहीत नव्हतं काय? वाझेचे किती फ्लॅट आहेत माहीत नाही, मध्यमवर्गीयांना साधी चाळीत रुम घेणं अवघड आहे. पण वाझेचे कुलाब्यापासून अख्ख्या मुंबईभर फ्लॅट आहेत. अशा माणसाला खात्यात घ्यायचं काम शिवसेनेनं केलंय. वाझेला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. सुशांत सिंगपासून दिशा सालियानपर्यंत, पूचा चव्हाणपासून मनसुख हिरेनपर्यंत किती हत्या आहेत. एखाद्या गॉडफादरशिवाय पोलीस अधिकारी असं करूच शकत नाही. पोलीसच हत्या करत आहेत. किती पोलीस त्यात आहेत माहीत नाही, असे राणे म्हणाले.
महाराष्ट्र राज्यात कोरोना वाढतोय, त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे मित्र पक्ष लॉकडाऊन करायला एवढे उतावीळ झालेले नाहीत. पण मुख्यमंत्री आहेत. कोरोना सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी ही घोषणा दिली. पण माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी पार पाडायला ते कमी पडले, कारण त्यांच्या घरातील पत्नी, मुलं सगळेच कोरोनाग्रस्त झाले. माझी जबाबदारी त्यांना पेलवलेली नाही. मुख्यमंत्र्यांचं धोरण चुकीचं असल्यानेच राज्यातील कोरोना कमी होण्याऐवजी वाढला.
आरोग्याच्या बाबतीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, मुंबईत काय यंत्रणा आहे? वर्षभरात तुम्ही 18 हजार बेड्स उपलब्ध करून शकला नाहीत. अन्य राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली, मग महाराष्ट्रात का वाढतेय? आता व्यापारी आणि जनतेनं लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. एकतर वर्षभर व्यापाऱ्यांना धंदा नाही. त्यामुळे हे सरकार आता घाबरलं आहे. शिस्त पाळा नाही तर आम्ही लॉकडाऊन करू, आता ते अशी धमकी देत आहेत, असंही राणे म्हणालेत. मुख्यमंत्री आणि या सरकारमुळे राज्य अधोगतीकडे गेलेय. लॉकडाऊन राज्याला आता पेलवणारं नाही. सगळे उद्योगपती आज कोलमडलेत, याची चिंता यांना आहे की नाही?, असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला.