मुंबई: नितेश राणे जे बोलले ते चूकच आहे. आम्ही त्याचं समर्थन करणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना फटकारले. तसेच नितेश राणेंच्या माध्यमातून विरोधकांचा एक सदस्य निलंबित करण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोपही फडणवीस यांनी व्यक्त केला.
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फर्मेशन’द्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी केलेल्या टीकेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या चर्चेत भाग घेताना देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना फटकारतानाच सरकारच्या मनसुब्यांचीही पोलखोल केली. विरोधी पक्षाकडे पाहायचंच नाही असा नवा पायंडा पडला आहे का. असं काही ठरलं आहे का? आम्ही लोकशाहीत लढणारे लोकं आहोत. रडणारे नाहीत. या ठिकाणी नितेश राणे संदर्भात उपस्थित झाला. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी असं वागू नये, असं फडणवीस म्हणाले.
भुजबळांना पाहून हूप हूप करणारे भास्कर जाधवच!
याच सभागृहात छगन भुजबळ तिकडे बसायचे. भास्कर जाधव सहीत आम्ही सर्व या बाजूला बसायचो. जेव्हा भुजबळ सभागृहात आल्यावर हूप हूप करून त्यांना डिवचणारे भास्कर जाधव होते. हे आम्ही पाहिलं आहे. या सभागृहाने हे पाहिलं आहे. त्याचंही समर्थन नाही. सभागृहाबाहेर जी काही घटना घडली त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण जर हे ठरवून आले असतील आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्या सदस्याला निलंबित करायचं ठरलं असेल तर हे लोकशाहीत योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.
मनमानीपणे निलंबित करणं योग्य नाही
आमचे १२ सदस्य निलंबित केले. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. आम्हाला आनंद नाही. या सभागृहावर न्यायालयाचा अधिक्षेप राहावा असं आम्हाला वाटत नाही. पण ही वेळ आमच्यावर तुम्ही आणत आहात. या ठिकाणी कायदा आणि संविधान पाळलं जात नाही. मनमानीपणे सदस्यांना एक वर्ष निलंबित करणे योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.
त्यावेळेस फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती?
‘कुणी तरी सांगितलं दोन बिस्किटं देतो. जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव आहे,’ असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यावरून भास्कर जाधव यांनी सभागृहात संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. तसंच याआधीच्या अधिवनेशनाचा किस्सा सांगत त्यांनी फडणवीसांवर ताशेरे ओढले.
सभागृहात भास्कर जाधव म्हणाले, मला फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि नाना (हरिभाऊ बागडे) यांना प्रश्न विचारायचा आहे. जर मला दोन बिस्किट घालून चावायला सांगितलं आणि मी कुत्रा असेल तर मी असं म्हणणार नाही. त्याचवेळी नितेश राणेंना दादांनी विचारायला पाहिजे होतं की, जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार भांडत होते, तेव्हा तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी १९ जणांना निलंबित केलं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मला किती बिस्किटं खायला घातली होती, हे चंद्रकांतदादांनी नितेशला विचारायला हवं होतं, असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला.
भाजपची भूमिका आधीच स्पष्ट : चंद्रकांत पाटील
भास्कर जाधव यांनी सभागृहात हा सवाल केल्यानंतर भवनात एकच गोंधळ उडाला. नितेश राणेंना निलंबित करा, अशी घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी उभे राहून हा विषय येथेच संपवण्याची मागणी केली. तसंच नितेश राणेंची जशी तुमच्याकडे क्लिप आहे, तशीच देवेंद्र फडणवीस यांचीही क्लिप आहे. जे घडलं, ते योग्य नाही, असं त्यांनी त्यात स्पष्ट म्हटलं. तरीही हा विषय येथेच संपवून सभागृह संपल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलवून कोणत्या शब्दांवर आक्षेप घेतला पाहिजे, यावर चर्चा करावी, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
सुहास कांदे, सुनील प्रभू, भास्कर जाधव आक्रमक
नितेश राणे यांनी आमच्या नेत्यांचा अवमान केला आहे. आम्ही हा अवमान खपवून घेणार नाही. जसे तुमच्यासाठी मोदी आहेत. तसेच आमच्यासाठी आदित्य ठाकरे आहेत. एक तर नितेश राणेंनी झाल्याप्रकाराबद्दल माफी मागावी अन्यथा त्यांना सभागृहातून निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना नेते सुहास कांदे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांनी केली. नितेश राणेंना निलंबित करण्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घालत नितेश राणे हाय हायच्या घोषणा दिल्या. गोंधळ प्रचंड वाढल्याने सभागृहाचं कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आलं.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना नितेश राणेंनी म्याव म्यावचा आवाज काढला होता. त्याचे आजही सभागृहात पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे नितेश राणे प्रकरणाकडे लक्ष वेधलं. आमच्या पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंचा आम्ही आदर करतो. सुधीरभाऊ आपण फार बोलतात. मात्र, आपलसुद्धा ऐकलं जात नाही. अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करतो की सभागृहात किंवा सभागृहाच्या प्रांगणात आमच्या नेत्याविरोधात बोललं गेल्यास आम्ही शांत राहणार नाही. आमच्या नेत्याचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सुहास कांदे यांनी दिला. तसेच नितेश राणेंना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.
चुकीला माफी नाही
यावेळी सुनील प्रभू यांनीही नितेश राणे प्रकरणावरून विरोधकांवर हल्ला चढवला. त्या दिवशी मी हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हाही चर्चा झाली. तेव्हाही ठरलं नेत्यांबाबत नीट बोललं पाहिजे. चुकीला माफी नाही. त्यामुळे नितेश राणेंना निलंबित केलंच पाहिजे, अशी आक्रमक मागणी प्रभू यांनी केली.
कायमस्वरुपी निलंबित करा
हा विषय अत्यंत गंभीर आहे. एखाद्या नेत्याबद्दल असं बोलणं योग्य नाही. मी मोदींबद्दल बोललो. तेव्हा मी माफी मागितली. तुमच्यासाठी जसे मोदी आहेत. तसेच आमच्यासाठी आदित्य ठाकरे आहेत. त्यामुळे नितेश राणेंना कायमस्वरुपी निलंबित करा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. नितेश राणेंनी माझ्यावरही टीका केलीहोती. मागे मला बोलले होते की हा कुत्रा आहे. त्याला बिस्किट दिले तर चावायला जातो. अभिरुप सभागृहात बोलले होते नितेश राणे. त्यामुळे यांच्यावर कारवाई करून त्यांना चाप लावलाच पाहिजे, असं जाधव म्हणाले.
मी अध्यक्षांची परवानगी घेतलीय मला पुरेपूर बोलू द्या. मागच्या अधिवेशनावेळी मी तालिका अध्यक्ष होतो. त्यावेळी फडणवीस साहेब तुम्ही विधान भवनाबाहेर अभिरुप विधानसभा भरवली. त्यावेळी हेच सदस्य अनेक वक्तव्य करत होते. युट्यूबवर क्लिप आहे. माझ्याकडे क्लिप आहे. याच संधीची गेले कित्येक दिवस मी वाट पाहत होतो.
सभागृहात गोंधळ
यावेळी भास्कर जाधव हातावर हात मारून जोरजोरात आपलं म्हणणं मांडत होते. त्याचवेळी विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनीही जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. हा गोंधळ अधिकच वाढल्याने अखेर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.