Top Newsराजकारण

राहुल गांधी मुंबईत येतील तेव्हा १४४ कलम लावणार का?; ओवेसींचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. एमआयएमच्या तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १४४ कलम लागू केलं. मात्र आगामी काही दिवसांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील मुंबईत येणार आहेत. त्यावेळीही तुम्ही मुंबईत १४४ कलम लागू करणार आहात का?, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

तिरंगा रॅलीमुळे महाविकास आघाडीला आडचण आली आहे. तिरंगा म्हणजे भारताची देशाची ओळख आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न झालेले देखील राष्ट्रवाद सांगतात. शिवसेना आता राष्ट्रवाद विसरली का? असा सवाल उपस्थित करत राज्य सरकार आता तिरंग्याविरोधात गेले असल्याची खंत असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केली आहे. आरक्षणासाठी एमआयएमकडून आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक या रॅलीमध्ये मुंबईतील चांदिवली भागात दाखल झाले होते. त्यावेळी असदुद्दीन ओवैसी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

मुस्लिम आरक्षणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाषणे दिली. परंतु आरक्षण कुठे आहे. कधीपर्यंत तुम्ही अशीच फसवणूक करून घेणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवसेना किती धर्मनिरपेक्ष आहे हे सांगावे, असं असदुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले. मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या, असंही असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. तसेच मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले.

पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा

सेक्युलॅरिझमचे गोडवे आजवर तुमची मते घेण्यात आली. त्यातून तुम्हाला काय मिळालं? या सेक्युलॅरिझमने तुम्हाला काय दिलं? मी केवळ संविधानातील सेक्युलॅरिझमला मानतो. पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला अजिबात मानत नाही. तुम्हीही हे पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा, असं आवाहन ओवैसी यांनी केलं.

तुम्ही कुणालाही मतदान करावं हा तुमचा हक्क आहे. पण तुम्ही कधीपर्यंत फसवले जाणार आहात. बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईत हिंसाचार झाला त्यानंतर तरी तुमचे डोळे उघडायला हवे होते. पण तुम्ही सर्व विसरला, असं ओवैसी म्हणाले. तुम्हाला धर्मनिरपेक्षता दाखवली गेली. भारतातील मुसलमानांना विचारतो धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला काय मिळालं? धर्मनिरपेक्षतेने तुम्हाला केवळ घोषणा दिल्या, आश्वासने दिले, पण आरक्षण मिळालं नाही, मशीद मिळाली नाही. मशिद पाडणाऱ्यांनी शिक्षा मिळाली नाही. न्याय मिळाला नाही. पण तरीही आपण धर्मनिरपक्षेतेला भुलतो. केवळ संविधानातील सेक्युलॅरिझमला मानतो. मी पॉलिटिकल सेक्युलॅरिझमला कधीच मानत नव्हतो आणि मानणार नाही. मुसलमानांनो पॉलिटिकल सेक्सुलॅरिझम धुडकावून लावा. तुम्हाला शासन कर्ती जमात बनायचं आहे, असं ओवैसी म्हणाले.

आरक्षण आपल्याला हवं आहे. संविधानाने मुलभूत अधिकार दिले आहेत. त्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. तुम्ही कुणालाही आरक्षण द्या. त्याला आमचा विरोध नाही. पण कोर्टाने सांगितल्यानंतरही आम्हाला आरक्षण दिलं जात नाही असं का? मुसलमानांना एवढा दुजाभाव का? असा सवाल त्यांनी केला.

तरीही धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणार?

यावेळी त्यांनी मुस्लिम आणि मराठा समाजाचं शिक्षण आणि नोकरीतील प्रमाण आकडेवारीसहीत दाखवून दिलं. तसेच मराठ्यांपेक्षा मुस्लिम किती मागास आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रात 4.9 टक्के मुसलमान पदवीधर आहेत. तर 8.9 टक्के हिंदू पदवीधर आहेत. ख्रिश्चन 22 टक्के पदवीधर आहे. तुम्ही फक्त 4 टक्के पदवीधर आहात. महाराष्ट्रात 22 टक्के मुस्लिम मुले प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शाळेत 13 टक्के तर दहावी 12 टक्केच मुस्लिम मुलं शिक्षण घेत आहेत. तरीही तुम्ही आरक्षण देत नाही. मुस्लिमांना शिकायचं आहे. पण त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे ते शिकू शकत नाही. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, आमची मुलं बघा शैक्षणिक प्रगती करतील. शिक्षणात आपला टक्का प्रचंड कमी आहे. तरीही कधीपर्यंत धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणार आहात? असा सवाल त्यांनी केला.

पवार-ठाकरेंना मराठ्यांचा कळवळा का?

महाराष्ट्रात 33 मुस्लिमांकडे जमीन नाही. तर फक्त एक टक्का मराठ्यांकडेच जमीन नाही. हा कोणता न्याय आहे? ही विसंगती असतानाही शरद पवारांना केवळ मराठ्याचा कळवळा का आहे? उद्धव ठाकरेंनाही मराठ्यांचा एवढा कळवळा का? असा सवाल त्यांनी केला.

खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा

चांदिवलीतील मैदानात झालेल्या सभेत बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी ‘हमारी आवाज पर छा गयी इतनी बौखलाहट, ये तो सिर्फ गुर्राना था… अभी दहाड बाकी है’, अशा शब्दात ठाकरे सरकारला इशारा दिलाय. तसंच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेबाहेर धरणं आंदोलनाची घोषणाही जलिल यांनी केलीय. ‘त्यांना वाटलं होतं सरकार आमचं आहे, आम्ही काहीही करु शकतो. मी समजत होतो जनता माझी आहे मी काहीही करु शकतो. त्यांनी पूर्ण ताकद लावली, की मी इथं पोहोचू नये. मी ही पूर्ण ताकद लावली. त्यामुळेच म्हणतोय, मुंबई… लो मै आ गया. मला माहिती आहे की, ज्या प्रकारे अडवण्यात आलं त्यात पोलिसांचा हात नव्हता. ते आपलं काम करत होते. पण ते कोण लोक होते ज्यांना आम्ही मुंबईत यायला नको होतं. ही रॅली आयोजित केली तेव्हा आम्ही स्पष्ट केलं होतं की ही एका पक्षाची रॅली नसेल. आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आता शिवसेनाही मुस्लिमांबाबत बोलतेय, त्यांच्या मुस्लिम नेत्यांनाही बोललो होतो. मराठा आंदोलनातून एक गोष्ट शिकायला हवी. मराठा बांधव कुठला पक्ष म्हणून रस्त्यावर उतरला नाही. आम्हीही सर्व पक्षातील मुस्लिम नेत्यांना दाखला देत विनवणी केली. पण त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही’, अशी खंत जलिल यांनी व्यक्त केलीय.

फक्त निवडणुकीपुरताच मुस्लिमांचा विचार

अनेकजण मला म्हणाले, आरक्षणाचा जुना विषय आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी कुठे उरल्या आहेत? पण मंजिल मिले ना मिले, ये मुक्कदर की बात है; हम कोशिश भी ना करे, ये गलत बात है. आम्ही प्रयत्न करु, पूर्ण ताकदीने प्रयत्न करु. प्रयत्नाचं फळ काय असतं हे आज आम्हाला समोर पाहायला मिळत आहे. आजवर मुस्लिमांचा वापर कसा केला जातो. मुस्लिमांना एखाद्या खेळण्याच्या वस्तूप्रमाणे कसं वापरलं जातं हे दाखवून देणार आहोत. निवडणुकीपुरताच मुस्लिमांचा विचार केला जातो, अशी टीका जलिल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलीय.

बाजारात कुत्र्यांची पिल्लं विकली जातात, आम्ही नाही

कुठे आहे 93 हजार एक जमीन? कुणी कुणाला वाटली, कुणी कुणाला विकली? 8 महिने झाले मला महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा सदस्य होऊन. या काळात 9 एफआयआर दाखल केले आहेत. जे विचार करत होते की आम्हाला कोण रोखू शकतं. आम्ही सर्वांना विकत घेऊ शकतो. त्यांना काय माहिती बाजारात कुत्र्यांची पिल्लं विकली जातात, आम्ही नाही. बाजारात सिंह विकले जात नाहीत, त्यातील एक स्टेजवर आहे, असं सांगत जलील यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय.

उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, काँग्रेसच्या नेत्यांनो, तुम्ही आमची 93 हजार एकर जमीन आम्हाला परत दिली तर तुम्ही मुस्लिमांसाठी जे काही बजेट देता ते देऊ नका. आम्हीच तुम्हाला तीनशे-चारशे कोटी बक्षीस म्हणून देऊ, असं सांगत विधानसभेचं अधिवेशन येत आहे. जेव्हा ते आत असतील तेव्हा बाहेर एक धरणं देऊ, असा थेट इशारा जलिल यांनी दिला आहे.

औरंगाबादहून एक खासदार येऊ शकतो, तर मुंबईतून चार का नाही?

मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या व्यक्तीला पूर्ण जग पाहतोय. संपूर्ण देशात कोण एक व्यक्ती आपल्या हक्काचा आवाज उंचावतोय. त्याच्या बाजूला जाऊन बसण्याचं भाग्य मला आज तुमच्या कृपेमुळं लाभलं. मी ओवेसी साहेबांना म्हणतो की मला मुंबईची जबाबदारी द्या. आमचे फैय्याज भाई, वारिस पठाण साहेब चांगलं काम करत आहेत. पण औरंगाबादहून एक खासदार येऊ शकतो तर मुंबईतील चार का येऊ शकत नाहीत. फक्त आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागेल, असं सांगत जलिल यांनी मुंबईत नेतृत्व करण्याचे संकेत दिले आहेत.

सत्ताधारी महाविकास आघाडीला सवाल

उच्च न्यायालयाचा निर्णय येऊनही हे सरकार आम्हाला आरक्षण का देत नाहीत? 2014 ते 2019 पर्यंत मी विधानसभेत होतो तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांचे नेते मुस्लिम आरक्षणासाठी भाषणं देत होते, प्रश्न विचार होते. पण 2019 नंतर सत्ताबदल झाला. आता तेच सत्तेत आले आहेत. विरोधात होते तेव्हा भाजपला मागत होते, त्यांना मुस्लिमांशी काही देणंघेणं नव्हतं. पण आता सत्तेत तुम्ही आहात, तुम्हाला तिथे पोहोचवण्यात आम्हा मुस्लिमांचाही हात आहे. पण सत्तेत आल्यानंतर विचार बदलला. आम्ही वाट पाहिली, पण नाही. आता आम्ही घोषणा केली की तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आम्ही येतोय. तेव्हा त्यांनी पोलिसांना पुढे केलं. सरकार हमसे डरती है, इसलिए पुलिस को आगे करती है… आम्ही येऊ नये म्हणून कोण खेळ खेळत होतं हे माहिती आहे, अशी टीकाही जलिल यांनी केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button