मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या भावनिक पत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती रेडकर यांचा या प्रकरणाशी संबंधच काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.
क्रांती रेडकर यांच्यावर कुणी व्यक्तिगत टीका टिप्पणी केलीय असं माझ्या पाहण्यात नाही. ईडी, सीबीआय, एनसीबी हे बाहेरचे अधिकारी महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. ते मराठीच आहेत ना, ते काय अमराठी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा सवाल केला.
दिल्लीतून केंद्रीय तपास यंत्रणांचं ज्या प्रकारे आक्रमण सुरू आहे, कारण नसताना अनेकांच्या मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहे. कालही देगलूरमध्ये निवडणूक सुरू असताना धाडी पडल्या. अशोक चव्हाण मराठी नाहीत का? अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथे सर्वच मराठी आहेत. प्रश्न सत्य आणि असत्याच्या लढाईचा आहे. खरं आणि खोट्याची लढाई आहे. पाहू आता काय होते ते, असं त्यांनी सांगितलं.
क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तीच आहे. बाळासाहेबांच्या विचारांची आहे. सरकार हे ठाकरे सरकार आहे. शरद पवार आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथे कुणावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी समीर वानखेडेंबाबत बोलण्यास नकार दिला. गुन्हा महाराष्ट्रात घडलाय. त्याविषयी मी फार बोलणार नाही. कारण तो सरकारचा विषय आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
जलयुक्त शिवारची चौकशी सुरु असताना क्लिन चीटचं कमळ कसं उगवलं?
जलयुक्त शिवाराची स्वतंत्र चौकशी एसआयटी, लाचलुचपत विभागाकडून सुरु आहे. चौकशी सुरु असताना अचानक निर्दोष, क्लिन चीटचं कमळ कसं उगवलं?, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर सडकून टीका केली. जलयुक्त शिवारबाबतची क्लिन चीट याबाबतची चर्चा म्हणजे कोणीतरी हे कारस्थान करतंय, असं राऊत म्हणाले.
आमच्यावर दोषी म्हणून चिखल उडवायचा आणि स्वत:वर आलं तर निर्दोष. हा पोरखेळ बंद व्हायला पाहिजे. या महाराष्ट्रात जो पोरखेळ सुरुय तो बंद व्हायला पाहिजे. जलयुक्त शिवाराचे आरोप शेकडो कोटींचा आहे. हे आरोप बघितल्यानंतर मला बिहारमधल्या चारा घोटाळ्याची आठवण झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यात चारा घोटाळा झाल्याचं सीबीआयने म्हटलं. तसंच महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराबाबत अनेक जिल्हे आणि तालुक्यात डबके तयार झाली. त्यातून किती पाणी जिरलं आणि कोणी जिरवलं याचा तपास सुरु आहे, असा टोला राऊतांनी लगावला. तसेच आमच्या बत्तीशीला कोणी चॅलेंश देऊ नका. आमचे दात मजबूत आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ‘पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असं ट्विट केलंय. तसेच मलिकांनी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपांबाबत राऊतांनी टीप्पणी केली होती. त्यांच्या त्या वक्तव्यावर आज पुन्हा पत्रकारांनी विचारलं. त्यावर त्यांनी, आतापर्यंतची स्क्रिप्ट लिहिलीय ती ‘शोले’ आणि ‘दिवार’पेक्षा कमी नाही. शोले, दिवार, जंजीर हे सलीम-जावेदचे अत्यंच गाजलेल्या स्क्रिप्ट आहेत ही त्याच तोडीची स्क्रिप्ट आहे. त्याच पद्धतीने नवाब भाईंनी जे सांगितलंय त्यावर विचार करु, असं मिश्किल उत्तर दिलं.