Top Newsराजकारण

यापूर्वी आरोप झालेल्या आणि भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचा ईडी चौकशीचे काय झाले?

राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आता थेट ईडी कार्यालयात जाऊन सवाल करणार

मुंबई : ईडीनं जरुर छापेमारी आणि कारवाया कराव्यात. पण ज्या नेत्यांवर आरोप झाले आणि ते भाजपमध्ये गेले त्या केसमध्ये ईडीने काय कारवाई केली आहे याची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार असल्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रमुख नेत्यांसह एक शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचं मलिकांनी सांगितलं.

अनेक नेत्यांवर आरोप होते किंवा ईडीचा ससेमिरा होता, मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती. या सर्व प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीकडून संकलित करण्यात आली असल्याचे सांगतानाच संपूर्ण यादी तयार करण्यात आली आहे. यात नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, मधुकर पिचड, विजयकुमार गावित आदींची नावे असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री, नेते वेळ घेऊन ईडीच्या कार्यालयात जाऊन या भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही, हे तपास का थांबले आहेत याची माहिती घेणार आहोत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत त्या गतीमान करा असे आवाहनही ईडी अधिकार्‍यांना करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

भानुशाली फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काय करत होता?

दरम्यान, गुजरातमध्ये पकडण्यात आलेल्या ड्रग्जवरूनही त्यांनी भाजपला घेरलं. समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होतेय. त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली. काल गुजरातच्या द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडले होते. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर तीन टन ड्रग्ज सापडले होते. त्याची किंमत २७ हजार कोटी रुपये होती. या ड्रग्जच्या खेळात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी, सुनिल पाटील हे किरीट सिंग राणा यांच्याकडे वारंवार का जात आहेत? हे सगळे गुजरातच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कशासाठी राहत आहेत?, असे सवालही त्यांनी केले.

सत्य शोधणे ही एनसीबीची जबाबदारी

मुंद्रा एअरपोर्टवरील ड्रग्ज प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले आहे. आता द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडल्यानंतर यातून सत्यबाहेर काढण्याची एनसीबीची जबाबदारी आहे. या देशातून अमली पदार्थाचा व्यापार नेस्तनाबूत करण्यासाठी १९८५ मध्ये कायदा करण्यात आला होता. त्याची अमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कितीही मोठा माणूस असू द्या, कारवाई करा

मुंबईत दोन – चार ग्रॅम ड्रग्ज पकडून बॉलिवूडला बदनाम करुन प्रसिद्धी करण्यात येत आहे. पण गुजरातमध्ये तर समुद्रमार्गे ड्रग्ज येत आहेत. मनिष भानुशाली, धवल भानुशाली व त्यांचे इतर सहकारी गुजरातमधून हे ड्रग्जचं रॅकेट सांभाळत आहेत. त्यामुळे या तपासाचा छडा एनसीबी व एनआयए यांनी लावावा. मग यामध्ये कोण कितीही मोठा असो, मंत्री असो किंवा कार्यकर्ता हे न पाहता ड्रग्जच्या खेळाला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button