Top Newsराजकारण

इंधनावरील करातून कमावलेल्या २५ लाख कोटींचे काय केले?

मल्लिकार्जुन खरगे यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

मुंबई : काँग्रेस पक्षाला ७० वर्षे सत्ता दिली मला फक्त ५ वर्षे सत्ता द्या म्हणून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी अवघ्या ७ वर्षांत देशातील जनतेचे जगणे मुश्कील करून ठेवले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या असून, मोदी सरकारने इंधनाच्या करातून २५ लाख कोटी रुपयांची कमाई केलीय. हा पैसा देशातील जनतेच्या हितासाठी किंवा राज्य सरकारसाठी वापरला जात नाही, असा आरोप करून १९ तारखेपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारला इंधन दरवाढ व महागाईप्रश्नी जाब विचारू, असे आव्हान राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना खर्गे यांनी इंधन दरवाढ, महागाई, अर्थव्यवस्था, कृषी कायदे या मुद्द्यांवर मोदी सरकारची पोलखोल केली. ते पुढे म्हणाले की, मोदी सत्तेत आल्यापासून पेट्रोल, डिझेलच्या किमती ३२६ वेळा वाढवल्या आहेत, तर मागील दोन महिन्यात ३८ वेळा दरवाढ केली आहे. यूपीएचे सरकार असताना इंधनावर ९.४८ टक्के केंद्रीय कर होता तो वाढवून ३२.९० रुपये केला. यूपीए सरकार असताना क्रूड ऑईलची किंमत १११ डॉलर प्रति बॅरल असताना पेट्रोल ७१ रुपये लिटर होते आणि आता मोदी सरकारच्या काळात क्रूड ऑईलचे दर ४४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली उतरले असतानाही पेट्रोल १०७ रुपये प्रति लिटर एवढ्या चढ्या भावाने विकले जात आहे. या प्रचंड दरवाढीतून मोदी सरकारने मागील सात वर्षात २५ लाख कोटी रुपयांची नफेखोरी करून जनतेला रस्त्यावर आणले आहे.

हे असले विश्वगुरु?

डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांवर त्याचा थेट परिणाम होतो. शेतीच्या साहित्यावरही जीएसटी आकारला जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यालाच रस्त्यावर आणले आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर असलेले तीन कृषी कायदे रद्द कारावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ७ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत पण मोदी सरकार कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाही. एका वर्षात देशातील ९८ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्याचे मोदींना काहीही सोयरसुतक नाही. विश्व गुरु होण्यास निघालेल्या मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहू, असा टोलाही खरगे यांनी हाणला. काँग्रेसच्या योजनेमुळे देशातील २७ टक्के जनता गरिबीतून बाहेर आली तर मोदींमुळे २३ टक्के जनता पुन्हा गरिबीत ढकलली गेली. त्यामुळे मोदी सरकार हे लोकांचं उत्पन्न वाढवणारं नव्हे, तर उत्पन्न घालवणारं सरकार आहे, असा आरोप खरगे यांनी यावेळी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button