मोदींना नकार, गडकरींना होकार; पश्चिम बंगालचे मुख्य सचिव उद्या दिल्लीत येणार
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, यानंतर दुसऱ्य़ाच दिवशी त्यांच्याविरोधात २०२४ चे रणशिंग फुंकले आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलावल्यावर त्यांना भेटायला गेल्या. आज ममता यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी गडकरी यांनी म्हणताच ममतांनी मुख्य सचिवांना उद्या दिल्लीला येण्याचे फर्मान सोडले आहे.
बंगाल निवडणुकीनंतर उसळलेल्या दंगलीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालचे मुख्य सचिवांना दिल्लीला येण्याचे आदेश दिले होते. परंतू त्यांना पाठविण्यास ममता यांनी नकार दिला होता. यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस, राजीनामा आणि पुन्हा राज्य सरकारची नोकरी असा घटनाक्रम घडला होता. आज गडकरींनी म्हणताच ममता यांनी मुख्य सचिवांना उद्या दिल्लीला बोलावले आहे.
गडकरी यांच्या भेटीनंतर ममता यांनी सांगितले की, बंगालमध्ये इलेक्ट्रीक बस, ऑटो, स्कूटरचे उत्पादन केल्यास चांगले होईल. आपले राज्य बांग्लादेश, भूतान, नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यांना जोडलेले आहे. यामुळे आम्हाला तिथे चांगल्या रस्त्याची देखील गरज असल्याची विनंती केली. ममता म्हणाल्या की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्य सचिवांना दिल्लीला पाठविण्यास सांगितले आहे. महासंचालक, पीड्ब्ल्यू मंत्री, सचिव, परिवाहन सचिव आणि मंत्री गडकरी स्वत: बैठक घेणार आहेत. यासाठी माझे मुख्य सचिव उद्या दिल्लीला येणार आहेत. गडकरींच्या सांगण्यावरून मी त्यांना पाठवत आहे.