तालिबानविरुद्धच्या युद्धात अमेरिकन सैनिकांनी फडकवले पांढरे निशाण !
अफगाणिस्तानमधून तालिबानचा खात्मा करण्यात अपयश आल्याची कबुली
काबूल : तब्बल २० वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकल्यानंतर अमेरिकन सैनिक आता माघारी परतत आहेत. मात्र या २० वर्षांच्या काळात अल कायदा ही दहशतवादी संघटना आणि तालिबानचा खात्मा करणे अमेरिकेला शक्य झाले नाही. त्यामुळे एकीकडून अमेरिकन सैनिक माघारी जात असताना दुसरीकडे तालिबानचे सैन्य अफगाणिस्तानवर पूर्णपणे कब्जा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे या २० वर्षे चाललेल्या लढाईमधून अमेरिकेला नेमकं काय मिळालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, दीर्घकाळ चाललेले हे युद्ध अमेरिका पराभूत झाली आहे, असे बहुतांश अमेरिकन सैनिकांचे मत आहे. अमेरिकन लष्करामधील सैनिक जेसन लायली याने देशाने या व्यापक युद्धामध्ये खर्च केलेले अब्जावधी डॉलर आणि हजारो सैनिकांसाठी खेद व्यक्त केला आहे.
वॉशिंग्टन टाइम्सच्या एका रिपोर्टमध्ये जेसन लायली यांनी हे मत मांडले आहे. ते म्हणाले की, आम्ही हे युद्ध हरलो आहोत. अगदी १०० टक्के. अफगाणिस्तानमधून तालिबानचा खात्मा करणे हे आमचे लक्ष्य होते. मात्र ते आम्ही साध्यच केले नाही. आता तालिबान पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर कब्जा करणार आहे.
लायली हे अमेरिकन लष्कराच्या मरीन रेडर नावाच्या विशेष पथकाचे सदस्य होते. त्यांनी इराक आणि अफगाणिस्तानमधील अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला होता. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावण्याच्या निर्णयाबाबत विचार करतात तेव्हा त्यांना आपल्या देशाबाबत प्रेम आणि राजकारण्यांबाबत संताप उफाळून येतो. मी या युद्धात जेवढे सहकारी गमावले ते अमूल्य होते, असे ते म्हणतात. लायलींचे सहकारी ३४ वर्षीय जॉर्डन लेयेर्ड याबाबत म्हणाले की, माझे सहकारी इराक आणि अफगाणिस्तानला कधी न जिंकता येणारे व्हिएटनाम मानतात., लायली आणि लेयेर्ड यांच्याशिवाय अनेक अमेरिकी सैनिकांचे हेच मत आहे.
लायली पुढे म्हणाले की, येथे तैनात असताना इतिहासकार या जागेला साम्राज्यांचे कब्रस्थान असे का म्हणतात, याची मला जाणीव झाली. १९ व्या शतकामध्ये ब्रिटनने दोन वेळा अफगाणिस्तानवर हल्ला केला. त्यात १८४२ मध्ये सर्वात वाईट पराभावाचा सामना ब्रिटनला करावा लागला. सोव्हिएट युनियनने १९७९ पासून १९८९ पर्यंत अफगाणिस्तानमध्ये युद्ध लढले. त्यात १५ हजार मृत्यू आणि हजारो जखमी सैनिकांना घेऊन त्यांना मागे परतावे लागले.