Top Newsफोकस

मेघगर्जनेने होणार दिवाळीचे स्वागत; उद्यापासून ४ दिवस जोरदार पावसाचा इशारा

पुणे : यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासह देशात बहुतांशी ठिकाणी पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. दरम्यान दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे.

सध्या श्रीलंका आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी येत्या आठवड्यात पावसाची स्थिती आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असली तरी पावसाची शक्यता नाही. पण उद्यापासून चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने उद्या सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. मंगळवार पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मंगळवारी राज्यात सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे, रायगड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या पाच जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

त्यानंतर, ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवशी पुण्यात देखील जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. या दोन दिवसासाठी पुण्यात येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button