वानखेडे यांचा अब्रुनुकसानीचा दावा; अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे नवाब मलिकांना हायकोर्टाचे निर्देश
मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सोमवारी दिले होते. त्यावर काल वानखेडेंच्या दाव्यात तथ्य नसल्याचं नवाब मलिकांनी हायकोर्टात स्पष्टीकरण दिले. पूर्व परवानगीशिवाय दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची विनंती मलिकांनी हायकोर्टाकडे केली. त्यावर आज सुनावणी पार पडली असून समीर वानखेडे यांच्याविरोधात ट्विटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळलीत का? असा सवाल विचारत नवाब मलिक यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तर ज्ञानदेव वानखेडे यांना ट्विट्स खोटे आहेत, हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
समीर वानखेडेंसोबत वाद असताना, त्यांची बहीण, मेव्हणीवर आरोप करण्याचं कारण काय?, यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीसही पाठवली आहे असा वानखेडेंनी हायकोर्टात दावा केला. त्यावर तुम्ही या घडीला केवळ होत असलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करा, तुमचा मुलगा एक सरकारी कर्मचारी आहे, तेव्हा सवाल उठणारच असे हायकोर्ट म्हणाले. आपण समीर वानखेडेंचा जन्म दाखला, काही फोटो दाखवले, मात्र ते आधीच जाहीर झालेलं आहे. आपण फक्त ती पुन्हा जारी केली असा नवाब मलिकांच्यावतीनं दावा करण्यात आला. मात्र, असं करताना त्याची सत्यता तुम्ही पडताळून पाहिली होती का? असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला. तसेच एक लोकप्रतिनिधी आणि एका राष्ट्रीय पक्षाचे नेते या नात्यानं तुमचीही तितकीच जबाबदारी नाही का? असे हायकोर्टाने नवाबांना खडसावले. त्यावर आपल्याला जेवढी माहिती आहे. त्यानुसार ही सर्व माहिती खरी आहे, असा नवाब मलिकांच्यावतीनं हायकोर्टात दावा करण्यात आला.
हायकोर्टाने वानखेडे आणि मलिक या दोघांनाही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मलिकांना जाहीर केलेली माहिती खरी आहे हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले तर वानखेडेंना हे आरोप चुकीचे आहेत हे सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणी सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मलिक यांनी प्रेस रिलीज, मुलाखती आणि समाजमाध्यमांद्वारे वानखेडे कुटुंबियांवर केलेल्या टिप्पण्या छळवणूक करणाऱ्या व बदनामीकारक असल्याचे जाहीर करावे आणि त्यापोटी १.२५ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती ज्ञानदेव वानखेडे यांनी दाव्यात केली आहे.