सिंधुदुर्ग : राणे विरुद्ध शिवसेना वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पॅनलसमोर महाविकास आघाडीने आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले आहे.
मेडिकल कॉलेज आणि बोलेरो गाड्यांसाठी घेतलेले कर्ज बुडवण्यासाठी राणे यांना बँकेवर ताबा हवा असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे, तर कुणीही कितीही प्रयत्न केला तरी या निवडणुकीत आपलेच पॅनल विजयी होणार, असा विश्वास राणे गटाला आहे. या संघर्षात कोण बाजी मारते त्याचा फैसला ३१ डिसेंबरला होईल.
नितेश राणे अटकपूर्व जामिनावर आज निर्णय
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालय आज निर्णय देणार आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर काल सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयात दोन्ही वकिलांमध्ये जोरदार खडजंगी झाली. सरकारी वकील जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप नितेश राणे यांच्या वकिलांनी केला. तर जबाबदार केंद्रीय मंत्री भर पत्रकार परिषदेत सांगतात लक्षात ठेवा, केंद्रात आमचं सरकार आहे. ही धमकी नाही तर काय? असा सवाल सरकारी वकीलांनी केला.
नितेश राणे यांच्या वतीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. सरकारच्या वतीनं प्रदीप घरत युक्तीवाद करत आहेत. तर संग्राम देसाई नितेश राणेंचे वकील आहेत. नितेश राणे तपासात सहकार्य करत नाहीत असा दावा सरकारी वकिलांनी केला.