Top Newsराजकारण

देगलूर बिलोली मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान; काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीनं देखील जोमानं प्रचार करुन निवडणुकीत रंगत आणली आहे. आज पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनानं देखील जय्यत तयारी केली आहे. देगलूर पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ६७७ अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. आज सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत होणार मतदान होणार आहे.

ही निवडणूक सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने १ हजार ६४८ कर्मचारी आणि २९ क्षेत्रिय अधिकारी यांची नेमणूक केली आहे असे देगलूर निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. या पोटनिवडणुकीत एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात महाविकास आघाडी, भाजपा, वंचित आघाडी अशी प्रमुख लढत पाहण्यास मिळणार आहे. या मतदारसंघ पोटनिवडणुकीत काँग्रेस तथा महाविकास आघाडीकडून जितेश अंतापूरकर, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष साबणे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात आहेत.

२०१९ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना ८९ हजार ४०० मते मिळून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांना ६६ हजार ५६० तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार रामचंद्र भरांडे यांना १३ हजार ३०० मतदान पारड्यात पडले होते.

या निवडणूकीत ४१२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रीयेत १ लाख ५४ हजार ९२ पुरुष मतदार, तर १ लाख ४४ हजार २५६ स्त्री मतदार व इतर ५ आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदाराची संख्या १८७ असून असे एकूण २ लाख ९८ हजार ५४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ही पोटनिवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची ठरत आहे. निवडणुकीच्या आधी शिवसेनेत असलेले सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना प्रवेश केल्यानंतर उमेदवारीही मिळाली तर दुसरीकडे काँग्रेसनं दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना संधी दिली. या निवडणुकीत प्रचारासाठी दिग्गजांनी हजेरी लावली आणि विजयाचा दावा केला आहे. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नितेश राणे, गोपीचंद पडळकर यांच्या अनेक दिग्गजांच्या सभा पार पडल्यात तर महाविकास आघाडीकडून मंत्री अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. वंचितकडून प्रकाश आंबेडकरांनी देखील सभा घेतल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button