Top Newsफोकस

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई दर्शन घटस्थापनेपासून भाविकांसाठी खुले

चांदवडच्या रेणुका मातेचा यात्रोत्सव रद्द

पंढरपूर : घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळं उघडणार आहेत. पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही ७ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. मंदिर समितीची बैठक आज पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिर समितीकडून एक नियमावलीही तयार करण्यात आली आहे. त्यानुसार रोज १० हजार भाविकांनाच विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेता येणार आहे.

घटस्थानपेपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांसाठी खुलं असणार आहे. रोज १० हजार भाविकांना मुख दर्शन घेता येणार आहेत. त्यातील ५ हजार भाविकांना ऑनलाईन पासद्वारे दर्शन घेता येईल. तर ५ हजार भाविकांना ऑफलाईन पद्धतीने दर्शन मिळणार आहे. तर पंढरपूरमधील भक्तांना सकाळी ६ ते ७ असा वेळ राखून ठेवण्यात आलाय. प्रत्येक तासाला १ हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान ६५ वर्षावरील नागरिक आणि १० वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आलीय. मंदिर प्रशासनाकडून मंदिर उघडण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

साई मंदिरही खुलं होणार

शिर्डीचे साई मंदिर ७ ऑक्टोबरपासून भक्तांसाठी खुले होणार आहे. या पार्श्वभूमीवर साई संस्थानकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संस्थानच्या नियमावलीनुसार दररोज १५ हजार भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यात सर्व भक्तांना ऑनलाईन नोंदणीद्वारेच मोफत दर्शन मिळणार आहे. दर तासाला दीड हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिणार आहे.

साई मंदिरात दर्शन पास ऑनलाईन पद्धतीनेच दिले जाणार आहेत. १५ हजार भाविकांना ऑनलाईन पास असेल तरच दर्शन मिळणार आहे. ऑफलाईन पास न देण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. वाढत्या कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा व रेस्टॉरंट वगळता सर्व आस्थापना रात्री ८.३० पर्यंतच सुरु राहणार आहेत. तर प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. online.sai.org.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन पास घेतल्यावरच दर्शन मिळणार आहे.

चांदवडच्या रेणुका मातेचा यात्रोत्सव रद्द

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदवडच्या रेणुका मातेचा यात्रोत्सव यंदाही रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली. चांदवडमध्ये गुरुवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्देशानुसार भक्तांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मात्र, यात्रोत्सव आणि पारंपरिक पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे नवरात्रोत्सवात कोटमगाव (ता. येवला) येथील जगदंबा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाने घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सप्तश्रृंगीगडावर पासची सक्ती

वणीच्या सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. नवरात्र काळात हे मंदिर २४ तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा ७२ तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button