अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विश्वास पाटील उद्घाटक; मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती
समारोपाला शरद पवार उपस्थित राहणार : भुजबळ

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्याहस्ते होणार उद्घाटन होणार असून विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर उपस्थिती लावणार आहेत. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.
अखिल भारतीय मराठी ९४ वे साहित्य संमेलन गोदातीरी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नगरीत होत आहे. खगोल शास्त्रज्ञ अध्यक्ष लाभल्यानं आजवर झालेल्या साहित्य संमेलनाचा तुलनेत यंदाचे साहित्य संमेलन बहारदार करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. मात्र अद्याप साहित्य संमेलनाला उद्घाटक मिळालेला नाही. ७८ व्या साहित्य संमेलनानाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर गोदा काठावर डिसेंबरच्या गुलाबी थंडीत नाशिकमध्ये सारस्वतांचा मेळा भरणार आहे. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान भुजबळ नॉलेज सिटीमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. खगोल शास्त्रज्ञ विज्ञान लेखक जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे विज्ञानवादी साहित्य संमेलन या संमेलनाचा पाया आहे, बालसाहित्य, कवीकट्टा, कथाकथन, ग्रंथ दिंडी, असे भरगच्च कार्यक्रम साहित्य संमेलनात आहेत
शेतकऱ्यांची दुस्थिती आंदोलने, राजसत्ताचा निर्दयीपणा, मराठी नाटक एक पाऊल पुढे, दोन पावले मागे, कोरोनानंतरचे अर्थकारण मराठी साहित्य व्यवहार, ऑनलाइन वाचन वाङ्मय विकासाला तारक की मारक, साहित्य निर्मितीची कार्यशाळा गरज की थोतांड, गोदतीराच्या सतांचे योगदान, नाशिक जिल्ह्याला १५१ वर्ष पूर्ण झाल्याबाबत जिल्ह्याचा जागर अशा परिसंवादाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
दिलीप प्रभावळकर, शफाअत खान, सुबोध भावे, कवी सौमित्र यांसह ज्येष्ठ साहित्यिक,कवी लेखकांना ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार असून सर्व रूपरेषा तयार आहे. मात्र संमेलनाच्या उद्घघटन आणि समारोपाला कोणाला बोलवायचे याबाबत मात्र एकमत होत नव्हते. अखेर यावरही निर्णय झाला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश
नाशिकमध्ये होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ना त्या कारणाने सतत वादात आहे. सुरुवातीला निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची वादावादी चांगलीच रंगली. संमेलनाच्या तारखांसाठी खोटी कारणे पुढे का केली म्हणत कौतिककराव ठाले-पाटील यांनी जातेगावकरांना पत्र लिहून सुनावले होते. हा वाद शमतो ना शमतो तोच साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावच टाकले नसल्याचे समोर आले. गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे १९३८ मध्ये झालेल्या २३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. खरे तर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी भगूर, नाशिक येथे झाला. त्यांनी जवळपास पन्नासच्यावर पुस्तके लिहिली. त्यात १८५७ चे स्वातंत्र्यसमर, संगीत उत्तरक्रिया, काळे पाणी, गांधी आणि गोंधळ, जोसेफ मॅझिनी, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमांतक, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड , शत्रूच्या शिबिरात, संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष, सावरकरांच्या कविता, क्ष – किरणें अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे. मात्र, असे असूनही सावरकरांच्या नावाचा उल्लेख साहित्य संमेलन गीतात उल्लेख नव्हता. विशेष म्हणजे संमेलन गीतामध्ये साम्यवादापासून ते थेट ‘भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे’ असा उल्लेख होता. नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख होता. मात्र, सावरकरांच्या नावाचा उल्लेख जाणूनबुजून टाळल्याची चर्चा होती. त्यावरून सावकरप्रेमी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. अखेर वाढता रोष पाहता संमेलन गीतामध्ये सावरकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संमेलन गीताच्या एका ओळीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार साहित्य संमेलन गीतातील नवे कडवे असे आहे…
रामकथेचा पट उलगडला इथल्या मातीवरती
ज्ञानाने सोपान गाठता मुक्त होय निवृत्ती
गडकिल्ले हे शिवरायांना सदैव वंदन करती
स्वातंत्र्य सूर्य सावरकर उजळे अनंत क्षितीजावरती