
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने गाडीने चिरडले होते. यामध्ये आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक जीप आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसते आणि त्यांना तशीच चिरडत पुढे निघून जाते असं दिसतंय. हा व्हिडीओ लखीमपूर खेरी या ठिकाणचा असल्याचं सांगण्यात येतंय.
जवळपास २५ सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलक शेतकरी सरकार विरोधी घोषणाबाजी करत रस्त्यावरून चालले आहेत आणि मागून अचानक एक जीप येते आणि त्यांना चिरडून तशीच पुढे निघून जाते. ही जीप केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील होती. या जीपमध्ये मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा हाच बसला होता असं प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितलंय.
TW: Extremely disturbing visuals from #LakhimpurKheri
The silence from the Modi govt makes them complicit. pic.twitter.com/IpbKUDm8hJ
— Congress (@INCIndia) October 4, 2021
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ते लखीमपूरचे भाजपचे खासदारही आहेत. ‘सुधर जाओ वरना दो मिनीट लगेंगे हमे…’ अशा पद्धतीची भाषा त्यांनी शेतकरी आंदोलकांबाबत वापरली होती. रविवारी याच केंद्रीय मंत्र्याचा एक कार्यक्रम लखीमपूर होणार होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिथं निदर्शनं करायचा निर्णय घेतला.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
लखीमपूर प्रकरणातील मृतांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारामध्ये मृत्यू झालेल्या आठ लोकांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार कुणाचा मृत्यू शॉक लागून, तर कुणाचा मृत्यू हॅमरेजमुळे झाला आहे. मात्र गोळी लागून कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या हिंसाचारात मारल्या गेलेल्या व्यक्तींचे सोमवारी पोस्टमार्टेम करण्यात आले आहे.
पोस्टमार्टेम रिपोर्टमधून मृत्यूची समोर आलेली कारणे…
१) लवप्रीत सिंग (शेतकरी) – फरफटत गेल्यामुळे मृत्यू, शरीरावर जखमांच्या खुणा, शॉक आणि हॅमरेज मृत्यूचे कारण
२) गुरविंदर सिंग (शेतकरी) – दोन जखमा आणि फरफटल्याच्या खुणा. धारदार किंवा टोकदार वस्तूमुळे झाल्या जखमा. शॉक आणि हॅमरेज
३) दलजीत सिंग (शेतकरी) – शरीरावर अनेक ठिकाणी फरफटल्याच्या खुणा, तेच ठरले मृत्यूचे कारण.
४) छत्र सिंग (शेतकरी) – मृत्यूपूर्वी शॉक, हॅमरेज आणि कोमा. फरफटल्याच्याही खुणा मिळाल्या.
५) शुभम मिश्रा (भाजपा नेता) – लाठ्या-काठ्यांनी झाली मारहाण. शरीरावर डझनभराहून अधिक ठिकाणी मिळाल्या जखमांच्या खुणा.
६) हरिओम मिश्रा (अजय मिश्राचा ड्रायव्हर) – लाठ्याकाठ्यांनी मारहाण. शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा. मृत्यूपूर्वी शॉक आणि हॅमरेज.
७) श्याम सुंदर (भाजप कार्यकर्ता) – लाठ्याकाठ्यांनी मारहाण, घसटल्यामुळे डझनभरपेक्षा अधिक जखमा.
८) रमण कश्यप (स्थानिक पत्रकार) – शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा, शॉक आणि हॅमरेजमुळे झाला मृत्यू.