राजकारण

५ जूनला मराठा मोर्चा निघणारच : विनायक मेटे

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अनेक मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही ठाकरे सरकारविरोधात मोर्चा उघडलाय. त्याचाच भाग म्हणून ५ जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चा काढण्याची घोषणा मेटे यांनी केली आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी मेटे सध्या बीड जिल्ह्यात बैठका घेत आहेत. कुठल्याही परिस्थितीत 5 जूनला मराठा मोर्चा निघणारच असा दावा मेटे यांनी आज परळीत केला. परळीतील विश्रामगृहात मराठा समाजाची बैठक पार पडली. त्यानंतर मेटे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मेटे यांनी बीड जिल्ह्यात मोर्चाची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई आणि परळी इथं मराठा समाजाच्या बैठका घेतल्या. या बैठकांना मराठा समाजातील लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ५ तारखेचा मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा निघणारच असा एल्गार मेटे यांनी आज परळीत केलाय. यावेळी मोर्चाला विरोध करणाऱ्या सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आणि काही संघटनांवर जोरदार टीकाही केली.

५ जून रोजीच्या मराठा मोर्चाला परवानगी देण्यासाठी विनायक मेटे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना एक निवदेन दिलंय. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड प्रमाणात रोष आहे. ५ जून २०२१ बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल याची खात्री असावी.

संभाजीराजेंचा मोर्चे काढण्यास विरोध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोर्चे काढण्याला संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध आहे. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button