राजकारण

जनगणना केल्यावरच ओबीसींना न्याय मिळेल : विजय वडेट्टीवार

नागपूर: ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने ओबीसींमध्ये खळबळ उडाली आहे. आरक्षणबाबत ओबीसींच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसींना न्याय द्यायचा असेल तर जनगणनेशिवाय पर्याय नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मागितल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी तीन पर्याय सांगितले आहेत. ओबीसी आरक्षण समितीची स्थापना करणे, ओबीसींच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन करणं आणि ओबीसींची जनगणना करणे या तीन पर्यायाद्वारेच ओबीसींचे आरक्षण टिकू शकते, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

ओबीसींचं आरक्षण टिकावायचं असेल तर निवृत्त न्यायाधीशांची एक समिती स्थापन करा. त्यानंतर ओबीसींची जनगणना करून तो अहवाल कोर्टात सादर केल्यास ओबीसी आरक्षण टिकू शकते, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांच्यात आक्रोश आहे. ओबीसी आरक्षण प्रश्नी माझं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी बोलणं झालं आहे. इतर सर्व ओबीसी नेत्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या प्रश्नावर सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

न्यायालयाच्या सर्व सूचनांचं पालन केलं जावं. ठरवलं तर महिन्या भरात ओबीसींची जनगणना होऊ शकते. सध्या संख्याबळावरून वादविवाद सुरू आहे. जनगणना केल्यास हे सर्व वाद दूर होतील, असा दावा करतानाच केंद्र सरकारनेही राष्ट्रीय स्तरावर आयोग निर्माण करून देशभर ओबीसींची जनगणना करावी, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मोठमोठ्या वकिलांची फौज लावली होती. आता या प्रश्नाला राजकीय स्वरूप देण्याचं काम सुरू आहे. त्यातून फायदा घेण्याचं काम केलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button