साहित्य-कला

ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचे निधन

मुंबई : नाटकाच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि उत्तम गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचे वयाच्या ९० व्या वर्षी शनिवारी रात्री ९.४५ वाजता विलेपार्ले येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा डॉक्टर कौस्तुभ कामत, सून डॉ. संध्या कामत आणि नातू अनिकेत आणि नातसून असा परिवार आहे. त्यांच्यावर पारसीवाडा स्मशानभूमी, अंधेरी पूर्व येथे अंत्यविधी करण्यात आले.

ज्येष्ठ गायक आणि अभिनेते पंडित रामदास कामत मूळचे गोव्याचे होते. लहानपणापासून रामदास कामत यांना वडील बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे मिळाले. कामत यांनी नाट्यसंगीताचे शिक्षण घेऊन पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी, प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्याकडून नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने पंडित रामदास कामत यांनी संगीत रंगभूमीवरील पाऊल ठेवले. ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत मदनाची मंजिरी’, ‘संगीत एकच प्याला’, ‘संगीत मंदारमाला’ अशा अठरा संगीत नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

नोकरी सांभाळून रामदास कामत यांनी तब्बल साठ वर्ष आपली सांगीतिक कारकिर्द मनापासून जपली. त्यांना २०१५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते मानाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. मग २००९ साली अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. रामदास कामत यांनी शेवटपर्यंत संगीताची आवड जपली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button